Thursday, October 11, 2018

"मी तांडा बोलतोय"- प्रा.रविंद्र राठोड

 प्रा. रविंद्र राठोड यांचा"मी तांडा बोलतोय काव्यकृतीः साहित्यातील एक नवा बंडखोर आविष्कार..!

          'मी तांडा बोलतोयं'प्रा.रविंद्र राठोड यांच्या या कवितेतील सौंदर्याचा आस्वाद घेताना कवीच्या संवेदनशील मनातील भावस्पंदनाचा वेध घेणे महत्वाचे आहे,कारण कवी तांडा होऊन तांड्याच्या रुपात आपले मनोगत व्यक्त करतात.प्रा.रविंद्र राठोड यांना मी फार जवळून अभ्यासला आहे त्यामुळे त्यांच्या मनन चिंतनातून प्रसवलेल्या या कवितेतील भावविश्वाचा वेध मला सहज घेता आला.नुकतेच त्यांची ही कविता मला वाचायला मिळाली या निमित्ताने "गोर साहित्यातला एक नवा बंडखोर आविष्कार साक्षात मला साक्षात झाला.
          समतेच्या सामाजिक तत्वावर आधारलेल्या सिंधू संस्कृतीच्या जडणघडणात तांड्याचा महत्वाचे योगदान आहे.सिंधू संस्कृतीत सुख,ऐश्वर्य दारी लोळणार्या तांड्याच्या दुरवस्थेला बघून कवी व्यथित होतो आणि शब्द बोलायला लागतात.
        इथल्या धर्म आणि समाज व्यवस्थेने तांडा जीवनाचे अस्तित्व नाकारले.आर्य,इंग्रज आणि स्वातंत्र्या नंतर स्वकीयांनीही तांड्याला अतोनात छळले.घटनात्मक हक्का पासून वंचित ठेवले.तांड्याच्या नशिबी लादलेल्या वेदना,व्यथा,दुःख,दारिद्र्य हे संवेदनशील मनाच्या कवीच्या ह्रदयात विसावता.

*भटकंतीला समानार्थी जमात*
 *थांबली...विसावली*
*माझ्या ह्रदयात...*
*मीही वाढलो दारात तिच्या*
*तांडा होऊन...!*

साहित्य शिवारात पदार्पण करण्या-या रविंद्र राठोडची वेदना अत्यंत बोलकी आहे.पशुपातळीवर तांडा जीवन जगण्या-यांचे दुःख,दारिद्र्य,यातना हे संवेदनशील मनाच्या या कवीला आश्वत्थामाच्या जखमे सारखी भळभळत असल्याचे जाणवते आणि कवी याची प्रांजळपणे कबूली देताना म्हणतात..

*अगणित तपं चालून*
*न थकलेली निरंतर पाऊलं*
*घट्ट रुजली माझ्यात*
*भळभळत्या जखमेसह*
*वाढवत आहेत मला..*
*तांडा होऊन..!*

        प्रा.रविंद्र राठोड यांची 'मी तांडा बोलतोयं' ही कविता चिंतनीय असून आशय सौंदर्याने बहरलेली आहे.'नंगरी वसतीनं सायी वेसं' हे मानवी मूल्य जपणा-या तांड्याच्या वाट्याला आलेले दुःख,दारिद्र्य आणि टिचभर पोटाची भुक भागविण्यासाठी सुगीचा हंगाम डोक्यावर घेऊन भटकंतीचे नशिबी आलेले जगणे हे या कवितेचे केंद्रवर्ति सूत्र आहे.
          या चरणातील रविंद्र राठोडची भाषाशैली विषयानुरुप असून *भळभळती जखम,न थकलेली निरंतर पाऊलं* हे भाषिक सौंदर्य रसिक मनाला अंतर्मुख करतात.
          समतेचे ब्रीद जपणा-या तांड्याला आपल्या टिचभर पोटासाठी गावकुसा बाहेरील भटके जगणे हे तांड्याच्या वाट्याला का यावे?हा या कवितेतील कवीचा चिंतन आणि चिंतेचा विषय आहे.गोर शब्द सैनिकांची नवी पिढी गोर साहित्याचा एक वेगळ्या दिशेने विचार करत असल्याचे या कवितेतून जाणवते.

*आभाळाचं छत,भूईचा गालिचा अंथरुन*
*चाकोरीमुक्त जगणारी मनं*
*जुळवून घेत आहेत*
*कुंपणातल्या जगण्यासाठी*
*भोगवटा समजून तांड्याचा...!*

       निसर्गाच्या सान्निध्यात आभाळाचं छतआणि भूईचा गालिचा अंथरुन स्वैर जगणारा तांडा इथल्या व्यवस्थेशी जुळवून घेत गावकुसा बाहेर आता बंदिस्त जीवन जगतो आहे आपल्या नशिबाचा भोगवटा समजून! हे ह्रदयद्रावक सत्य *कुंपणातल्या जगण्यासाठी;भोगवटा समजून तांड्याचा* अशा दाहक शब्दात प्रा.रविंद्र राठोड आपल्या भावना व्यक्त करतात.
           दारिद्र्याच्या भिषण आगीत असह्य वेदनेने तडफडत मुकाट्याने प्रपंचाचा गाडा रेटत भविष्याचा वेध घेणा-या तांड्यात दुःखाचा डोंगर पचवत जगण्याचे दुःख आपल्याही वाट्याला आलेला असल्यानचे कबूली देताना प्रा.रविंद्र राठोड म्हणतात.

*ओंजळीत पडल्या निखार्यास*
*आसवांनी कोळसा करुन*
*मुकाट्याने संसार थाटत*
*भविष्यवेध घेणारी जमात*
*मीही तसाज जगलो*
*तांडा बनून...!*

या चरणातील *ओंजळीत पडल्या निखा-यास;आसवांनी कोळसा करुन* कवीची ही भाषा सरळ रसिकांच्या काळजाला खेटणारी असून या चरणातील भाव सौंदर्य शब्दातीत आहे.
           आपल्या हजारो वर्षाच्या दिर्घ प्रवासात तांड्याने कित्येक स्थित्यंतरे पाहिली. इंग्रजांनी तब्बल 81 वर्ष या देशाभिमानी तांड्याला छळले,चोर गुन्हेगारीचे कलंक तांड्याच्या माथी मारून तांड्याचे जगणे कैद केले.स्वातंत्र्याने तांड्याला काय दिले तर उपासमारीचे जिणे.या देशाचे "नेटिव्ह सन्स" असलेल्या तांडा जीवन जगणा-यांचे प्रतिष्ठेचे जगणे स्वातंत्र्याने हिरावून घेतले.
           प्रस्थापितांच्या हजारो वर्षाच्या शोषणाने तांडा जीवनांचे नागडं झालेल्या भटक्या सौंदर्याचे अदभुत चित्रण रसिका पुढे ठेवताना कवी म्हणतात..

*फिरंग्याच्या घृणेने,*
*प्रस्थापितांच्या शोषणाने*
*नागडं झालेले भटके सौदर्य*
*कोरत आहेत दगडावरती*
*आपल्या अस्तित्वाच्या खुणा*
*बलदंड बाहू,कणखर मनगटाच्या जोरावर*
*तांड्याच्या...सोबतीने...!*

        प्रा.रविंद्र राठोड यांची "मी तांडा बोलतोयं" ही कविता तांड्याच्या वाट्याला आलेल्या व्यथा,वेदना आणि हजारो वर्षांचा छळाचे दर्शन घडविणारी असून या चरणातील *नागडं झालेले भटकं सौंदर्य* हे भाषिक सौंदर्य रसिक मनाला भावतात.तांडा आपल्या अस्तित्वाच्या खुणा दगडावरच नव्हे तर आपल्या अंगावरही गोंदून घेऊन जपून ठेवलेला आहे.
      या कवितेतील आशय धन हजारो वर्षांच्या शोषणा विरुद्ध पेटून उठण्यास प्रवृत करणारे आहेत येवढे मात्र खरे!
       आजच्या पेक्षा उद्याचा उगवणारा सूर्य भयानक तर नसेल ना? या भीतीने ग्रासलेला उध्वस्त तांडा आपल्या व्यथा वेदनांचे गाठोडे डोक्यावर घेत आभाळागत फाटलेला संसार शिवायला घेऊन बेचिराख अशा सप्तसिंधूच्या ढिगा-यातला,तांड्याचा नायक आणि तांड्याचे अस्तित्व,अस्मिता कवी शोधतोयं तांडा होऊन तांड्यासाठी...!

*उध्वस्त मनाचे,दुःखाचे*
*फाटलेला आभाळ शिवायला घेऊन*
*तांडा आता शोधतोयं*
*आपली नायकी*..
*सप्तसिंधूच्या ढिगा-यातली*
*तांडा होऊन...तांड्यासाठी...!*

     तांड्याचे जगणे वाट्याला आल्या शिवाय तांड्याची वेदना मांडता येणे शक्य नाही.प्रा.रविंद्र राठोड हे शहरी जीवन जगत असले तरी मनाने ते तांड्यातच आहेत.तांडा जीवनात कविच्या वाट्याला आलेले भोगणे आणि त्यांना आलेली ही अनुभूती,भोगणे हे नपूसक नाही तर ही अनूभूती उर्जामय आहे.
     खरं म्हणजे या कवितेचा अन्वयार्थ लावताना ताकतीचे शब्दही असमर्थ ठरावेत इतकी ही कविता भाषा आणि आसय सौंदर्याने ठसठसीत आहे.
            प्रा.रविंद्र राठोड यांनी पिढ्यानपिढ्या तांड्याने भोगलेल्या व्यथा वेदनेचा ईतिहास  *मी तांडा बोलतोय* या कवितेतून दिर्घ रुपात खंड काव्यातून नव्या पिढीला बहाल करावे..ही अपेक्षा..!

                 *भीमणीपुत्र*
             *मोहन गणुजी नायक*

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...