"ग्रामसुधारणेची पंचसूत्री"
-वसंतरावजी नाईक साहेब(मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
-वसंतरावजी नाईक साहेब(मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
(१४ ऑगस्ट १९७२ रोजी २६ व्या स्वातंत्र्यदिनाप्रसंगी आकाशवाणी केंद्रावरून व्यक्त केलेले मनोगत )
संकलन- प्रा.दिनेश सेवा राठोड
आपला देश स्वतंत्र होऊन या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत . सुमारे दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या देशातील थोर नेत्यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळाले. अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला . स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लाखो लोकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले , त्याग केला . ज्यांच्या असीम त्यागाने या देशाला स्वातंत्र्य लाभले त्यांच्यापैकी जे आज आमच्यात नाहीत त्यांना श्रद्वांजली अर्पण करणे व जे आमच्यात आहेत त्यांना मानाचा मुजरा करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साहजिकच राष्ट्रविकासाच्या योजना आपल्याला हाती घ्याव्या लागल्या. त्यासाठी पंडित जवाहरलालजींचे मार्गदर्शन आपल्याला लाभले. देशात नियोजनाचे युग सुरू झाले . अनेक खेड्यांतून नवीन नवीन कामे उभी राहिलीत. गावक - यांनी या कामांसाठी सहकार्य दिले. शासनाने देखील आपली जबाबदारी उचलली. ज्या खेड्यात स्वातंत्र्यपूर्व काळात निराशा , दारिद्रय , रोगराई आणि अज्ञान यानी थैमान घातले होते तेथे आता काही तरी नवीन होऊ शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला. ग्रामीण जीवनाचे चित्र काहीसे बदलले, तरी पण अपेक्षित प्रमाणात खेड्यांची उन्नती अजून झालेली नाही. देश सुखी आणि समृद्ध व्हावयाचा असेल तर खेडी सुखी आणि समृद्ध झाली पाहिजेत. देशातील जनता सुखी व्हावयाची असेल तर खेड्यातील जनता सुखी झाली पाहिजे आणि म्हणून खेड्यातील जनता सुखी कशी होईल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी खेड्यात विकासाच्या कामांना वेग द्यावा लागेल. या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी प्रत्येक खेड्याने आपल्या गावाच्या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी आपला हिस्सा उचलण्यास पुढे आले पाहिजे. अंगीकृत कार्यक्रम पार पाडण्याचा निर्धार केला पाहिजे, आज गावात अनेक उणिवा आहेत . त्या दूर करावयाच्या झाल्यास आपल्याला मुख्यत : पाच गोष्टीवर भर द्यावा लागेल . ग्रामसधारणेची ही पंचसूत्री आहे. पहिली गोष्ट म्हणजे गावाची रचना नीटनेटकी असली पाहिजे , गावातील कोणत्याही भागात बैलगाडी जाईल अशा प्रकारे रस्ते रूंद व चांगल्या स्थितीत असले पाहिजेत, गावात डास , मो - या नाहीत ही परिस्थिती बदलली पाहिजे , सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणे दूर केली पाहिजेत , घराची बांधणी आरोग्य वर्धक असली पाहिजे , असपास झाडे लावण्यास योग्य अशी एक हेक्टर जागा निवडून तेथे झाडे लावावीत व त्यांची जोपासना करावी , दुसरे म्हणजे पंचायत , सहकारी संस्था , वाचनालय , महिला मंडळ यासारख्या ग्रामविकासाला मदत करणाऱ्या या सार्वजनिक संस्था गावात असल्या पाहिजेत. या संस्थात ग्राममवासीयांनी जास्तीत जास्त भाग घेऊन त्या कार्यक्षम ठेवाव्या , निरनिराळ्या सरकारी योजना यशस्वीपणे राबविल्या पाहिजेत . तिसरे म्हणजे वश , पंध , धर्म , जात वावर अधारित माणसामाणसातील भेद नष्ट केले पाहिजेत , गावातून अस्पृश्यतेचे संपूर्ण उच्चाटन झाले पाहिजे. जोपर्यत गावातील भेदाभेद उच निच भाव नष्ट होत नाहीत, तोपर्यंत खेड्यात सौख्य व समृद्धी येणार नाही आणि म्हणून समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी समतेची भावना वाढीस लावण्याच्या कामास सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे , चौथे हणजे गावातील आरोग्य टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सतत प्रयत्न व्हावयास पाहिजे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. गाव नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे . पाचवे म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादन वाढविण्याच्या बाबतीत गाव प्रयत्नशील असावा. रोज नवीन लागणारे शास्त्रीय शोध , सुधारित बी - बियाणे व अवजारे , रोगप्रतिबंधक उपाय , रासायनिक खते व पाणी यांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेऊन उत्पादन वाढविण्याचा ध्यास गावक - यांनी घेतला पाहिजे. उत्पादन वाढविल्याशिवाय गावात आणि पर्यायाने देशात सुख व समृद्धी येणार नाही. म्हणून शेतक - यांनी आणि शेतमजुरानो उत्पादनवाडीचा कार्यक्रम तयार करून तो अमलात आणावा.
याही वर्षी पावसाच्या अवकृपेमुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली , तो भरून काढण्याकरिता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून रब्बी पिक अधिक प्रमाणावर घेण्याचा कार्यक्रम आता आपण तयार करावा. दुष्काळाचा सुकाळ करण्याची जिद्द ठेवून रब्बी हंगामातील उत्पादन वाढवावे.
हा कार्यक्रम प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी सर्व गावक - यांनी आपले भेद विसरून ग्रामसफाईसाठी दिनांक १४ ऑगस्ट रोजी एकत्र यावे व साफसफाई करावी . याच दिवशी गावक - यांची एक सभा व्हावी. या सभेत गावात जे लोक बेघर असतील किंवा ज्यांची घरे फारच लहान असतील त्यांना स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्धापन वर्षात निदान राहण्यायोग्य असा निवारा मिळावा या दृष्टीने विचार व्हावा. सभेत ज्यांना घराची आवश्यकता आहे अशांची यादी तयार करावी. व त्यासाठी एकंदर जागा किती लागेल याचा अंदाज घ्यावा. तसेच ही जागा कुठे उपलब्ध होऊ शकेल ते पण पाहावे. हुवी असलेली जमीन सरकारी किंवा ग्रामपंचायतीची असल्यास ती मोफत उपलब्ध होईल व जमीन खासगी मालकीची असल्यास सामोपचाराने त्याही जमिनीचा ताबा ताबडतोब मिळेल अशी व्यवस्था करावी. त्या जमिनीची किंमत सरकार देईल. गरीब लोकांची घरे बांधण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात सरकारी मदत मिळण्याबाबतची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल.
१४ ऑगस्टच्या मध्यरात्री ग्रामस्थांनी सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून राष्ट्राशी एकनिष्ठ राहण्याची व प्रयत्नांची पराकाष्ठा करून देश सुखी, समृद व बलशाली बनविण्याची शपथ घ्यावी. शपथेचा नमुना सर्व गावांना व संस्थांना पाठविण्यात आला आहे . वर्तमानपत्रांतूनही तो प्रसिद्ध झाला असेल.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी उत्साहाच्या नवीन वातावरणात ध्वजवंदनाचे व प्रभातफेरीचे कार्यक्रम आयोजित करावेत. त्याच दिवशी सर्व गावक - यांनी एकत्र येऊन आपला गाव सुधारण्याचा एक कार्यक्रम निश्चित करावा दुपारी सर्व गावक - यांनी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करावा. त्यासाठी गावातील सर्वांनी आपला शिधा एकत्र करावा. सर्व जाती धमांच्या लोकांनी सहभोजनाच्या निरनिराळ्या कामात भाग घ्यावा. या कार्यक्रमादारे सहजीवनाची व समानतेची भावना वाढीस लावावी आणि ती नेहमोकरिता टिकून राहील याची काळजी घ्यावी.
गाव आदर्श बनविण्यात सरकारी कर्मचारी त आवश्यक ती मदत करतीलच पण बुद्धीमतांनी आणि विद्याथ्यांनी जवळपासचे एखादे खेडे निवडून ते आदर्श बनविण्याचा संकल्प करून काम केल्यास काही अंशी सामाजिक ऋण परतफेड ते
करू शकतीलच शिवाय राष्ट्रविकासाच्या महान कार्यास हातभार लावण्याचे श्रेयही त्यांना मिळेल.
हा कार्य पार पाडण्यासाठी जेथे जेथे शासनाची, जिल्हा परिषदेची किंवा पंचायत समितीची मदत आवश्यक असेल तेथे तेथे ती नियमानुसार आणि योजनेनुसार हमखास मिळेल एवढे आश्वासन मी शासनातर्फे देऊ इच्छितो .
ग्रामविकासाच्या या विधायक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक विकास गटातील दोन आदर्श खेडयांना वर्षअखेर शासनातर्फे बक्षिसे देण्यात येतील. पहिले बक्षीस साडेसात हजार रुपयांचे आणि दुसरे पाच हजार रुपयांचे राहील.
या विधायक स्पर्धेत सर्व गावांनी भाग घेऊन आपापले गाव आदर्श बनविण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे. या संकल्पसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, देशाने माझ्यासाठी काय केले हे न पाहता देशासाठी मी काय केले याचे समाधानकारक उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाला देता येईल असे राष्ट्रकार्य पुढील एका वर्षात आपण केले पाहिजे. गाव महान बनला तरच देश महान बनणार आहे हे लक्षात ठेवून स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्धापन वर्षात महाराष्ट्रातील सर्व गावे आदर्श अनविण्याच्या महत्त्वाच्या कामात आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे. मला आशा आहे की, आपण सर्व जण गावे आदर्श बनविण्यास झटू व विकासाच्या आघाडीवर राहण्याची महाराष्ट्राची परंपरा याही बाबतीत कायम ठेवू .
(संकलक- हे साहित्यिक असून वसंतरावजी नाईक राष्ट्रीय बंजारा समाज भूषण व राष्ट्ररत्न पुरस्काराने पुरस्कृत आहे)
profdineshrathod@gmail.com www.profdineshrathod.blogspot.com
Cell- +91-9404372756
स्रोत- "आवाहन"- वसंतरावजी नाईक (निवडक भाषने) पारिजात प्रकाशन