Saturday, May 21, 2022

साहित्य संमेलन

असं अवकाळी येणं बरं नव्हे !  
---------------‐--------------------
        पाऊस, पाणी आणि जीवन हे समानार्थी शब्द. सर्व सजीव सृष्टीच्या समृद्धीसाठी आवश्यक ! हा पाऊस वेळेवर मोसमी आला, तर सर्वच स्तरातून त्याचं स्वागतच होतं. पण, तोच जर अवकाळी आला, तर कोठे त्याचं स्वागत हात उंचावून होतं, तर कोठे बोटं मोडून, शिव्यांची लाखोली वाहून केलं जातं. त्याच्या आगमनाने ज्याचं होत्याचं नव्हतं झालेलं असतं असा सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून तर सर्वच लोक त्याला नाक मुरडत असतं. याउलट ग्रीष्मात बंगल्याच्या खुराड्यात पंखे-कुलरच्या दमट वातावरणात राहणारा पोट भरल्या चोचल्यांचा वर्ग हाशहुश्श करीत घराबाहेर पडतो. अहाहा !करीत आनंदाने बेभान होतो. अवकाळी पावसाचं तो मोठ्या आनंदाने स्वागत करतो. म्हणजे एक वर्ग सुखावणारा तर दुसरा दुखावणारा.अवकाळी पावसाच्या वाट्याला हे येतचं असतं.
    पाऊस; अवकाळी, सुखावणारा आणि दुखावणारा हे सारं वाचून तुम्ही संभ्रमित झाला असाल. पण संभ्रमित होण्याचं काही कारणच नाही. उपरोक्त विवेचनाला संदर्भ आहे तो गोर बंजारा साहित्य संघाने वाशिम येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय गोर बंजारा तिसर्‍या साहित्य संमेलनाचा. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मेच्या कडक उन्हात गरमनरम भवति न् भवति सुरू आहे. सुशिक्षित जागरूक समाजात हे घडणं अपेक्षित असतं. या चर्चेत जसे सामान्य लोक सहभागी आहेत; तसेच अतिअसामान्यही आहेत. काही साहित्य संमेलनाच्या संयोजक, आयोजकांकडे बोट दाखविणारे तर काही साहित्य संमेलन आणि साहित्य संमेलनाध्यक्षाच्या संदर्भात आक्षेप नोंदविणारे महानुभाव आहेत. त्यापैकी काही आक्षेपांविषयी माझे मत मी व्यक्त करीत आहे.
        प्रो. डाॅ. अशोक पवार हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे अर्थशास्र विभागात कार्यरत आहेत. गोर बंजारा समाजाच्या इतिहासाचे ते गाढे अभ्यासक आहेत. इतिहासकार, प्रज्ञावंत लेखक म्हणून अखिल भारतात सर्वदूर सुपरिचित आहेत. आदरणीय सरांनी वाशिम येथे २८ व २९ मे २०२२ रोजी संपन्न होणार्‍या साहित्य संमेलनाबाबत व या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांबाबत समाज माध्यमांवर काही आक्षेप नोंदविलेले आहेत. त्यातील काही आक्षेप निश्चितच साहित्य संमेलनाच्या निकषांवर आधारित आहेत, तर काही वेदनादायी आहेत.
        पहिला आक्षेप, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? या आक्षेपात काही उपआक्षेप दडलेले आहेत. संमेलनाध्याक्षाची साहित्यसंपदा किती? साहित्य क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व कोणते?
        साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? या आक्षेपाद्वारे आक्षेपकर्त्यांना नाव अपेक्षित नाही. संमेलनाध्यक्षांची पात्रता काय? योग्यता काय? खरं तर लायकी काय? हे अपेक्षित आहे. डाॅ. अशोक पवार यांच्याकडून गोर बंजारा समाज ही अपेक्षा करूच शकत नाही. कारण त्यांची उंची फार मोठी आहे. असो. कधीकधी व्यक्तीद्वेषामुळे असं नकळत घडून जातं. परंतु याचे परिणाम समाज पोषणासाठी हिताचे नसतात.
        साहित्य संमेलनाध्यक्ष डाॅ. प्रकाश राठोड आहेत. ते इहवादी विचारवंत, मानवतावादाचे आग्रही खंदे पुरस्कर्ते. सत्यान्वेषी समीक्षक, भटक्या-विमुक्तांसह गोर बंजारा समाजातील अंधार दूर करण्यासाठी लेखणी झिजवणारा झुंझार लढवय्या प्रतिभावंत लेखक, शोषितांच्या, अभावग्रस्तांच्या जीवनाला नवविचारांचे नवीन पंख देणारा, त्यांना जळवांसारख्या चिकटलेल्या देव-देवता, दैव, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, कर्मकांड, भूत, भानामती, करणी इत्यादी अंधश्रद्धांना गोर समाजाच्या होळीत जाळून राख करणारा, त्यांच्या हाती उजेडाचा सूर्य सोपविणारा प्रकाश ! चार्वाक - बुद्धापासून विज्ञानवादी समाजसुधारक संत सेवालाल महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आणि महाराष्र्टाचा चेहरामोहरा बदलवून टाकणारे विक्रमी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नायक या परंपरेने जोपासलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आर्थिक सुबत्ता या जीवनमूल्यांचा मळा फुलविणारा आणि आपल्या क्रांतिकारी शब्दाशब्दातून मानवतेचा जयघोष करणारा महाराष्ट्राचा बर्टांड रसेल !
        'बंजारा समाज : साहित्य आणि संस्कृती', 'संवादाचा आदिबंध (संपा.), 'हरितक्रांतीचा सूर्योदय', 'तांडा: विद्रोहांच्या विजांचा, 'बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने' (संपा.), 'हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा?', 'यशवंत मनोहर यांच्या कवितेतील सूर्यप्रतिमा' असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या 'बंजारा समाज : साहित्य आणि संस्कृती' या ग्रंथावर महाराष्ट्रभरातून समीक्षा आल्या. त्या समीक्षांचे संपादन प्रा. ताराचंद चव्हाण यांनी 'बंजारा समाज : साहित्य आणि संस्कृतीचे नवे मूल्यमंथन' या ग्रंथात केलेले आहे. तसेच 'विद्रोहाची दमाळ' (कवितासंग्रह), 'बंजारा-मराठी शब्दकोश', 'इहवादी विचारवंत : डॉ यशवंत मनोहर', 'बंजारा संस्कृती आणि बोलीभाषा', 'बंजारा : धर्मवादी की धर्मातीत', 'तांडा: एक काव्यमय इतिहास', 'आत्माराम कनीराम राठोड यांचे साहित्य' आणि 'बंजारा वाङमयकोश' असे अनेक ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांचे अनेक समीक्षाग्रंथही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तसेच महाराष्ट्र टाइम्समध्ये 'जीवनमर्म' या नावाने सदरलेखनही त्यांनी केले आहे. अनेक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना लिहिली. अखिल भारतीय स्वरूपाच्या अनेक संमेलनांमध्ये, चर्चासत्रांमध्ये  अध्यक्ष, वक्ते या नात्याने ते उपस्थित राहिलेले आहे. त्यांच्या या प्रखर ध्येयनिष्ठ आणि प्रखर क्रांतिकारी बाण्याच्या साहित्यसंपदेवर नुसती नजर टाकली तरी डाॅ. प्रकाश राठोड कोण आहेत असा प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी करू शकत नाही. 
        दुसरा आक्षेप साहित्य संमेलनाध्यक्षांचे समाजप्रबोधन काय?
        आक्षेपकर्त्यांनी ह्या आक्षेपासोबत"प्रबोधन" या शब्दाची परिभाषा मंडित केली असती तर या आक्षेपाचे खंडन करणे गरजेचे वाटले नसते. "प्रबोधन" या शब्दाचा अर्थ "जागृती" असा होतो. जनतेला जागरूक करण्याचे अनेक माध्यम आहेत. प्रामुख्याने कलापथक, दंडार, भजन, कथा, लघुकथा, बोधकथा आदि पारंपरिक प्रकार. मुद्रणाचा शोध लागल्यानंतर "लेखन" हे प्रबोधनाचे सशक्त माध्यम ठरले. डाॅ. प्रकाश राठोड यांच्या ग्रंथांची नुसती शीर्षकं जरी वाचली तरी त्याचं समाजप्रबोधन काय? या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं. त्यांची साहित्यसंपदा अक्षर साहित्याची उंची गाठणारी आहे. ती साहित्य विश्वातील पूर्वसुरींच्या पंगतीत सन्मानाने विराजमान होणारी क्रांतीदर्शी संपदा आहे, हे त्यांच्या टीकाकारानांही नाकारता येणार नाही. वाचकांनी, चोखंदळ साहित्य अभ्यासकांनी ती जात व धर्माच्या चष्म्यातून न वाचता, न अभ्यासता मानवतेच्या चष्म्यातून वाचावी, अभ्यासावी. तिची सत्यान्वेषी समीक्षा करावी. तेव्हा तिचे खरे मोल लक्षात येईल.ती प्रबोधनगामी आहे. ती उजेडगामी आहे. अंधाराचे तिला वावडे आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या जीवनमूल्यांच्या संदर्भांकरिता बौध्दकालीन साहित्याचा ते दाखला देतात म्हणून त्यांना बौध्द म्हणून हिणवणे, शिव्याशाप देणे, त्यांचा मानसिक छळ करणे ह्या आकसपूर्ण गोष्टी गोरधाटीत बसतात काय? माझ्या दृष्टीने खरे प्रबोधनकार तर डॉ. प्रकाश राठोडच आहेत. आतापर्यंत जी साहित्य संमेलने झालीत ती त्यांच्याच पुढाकाराने झालीत. अ. भा. पहिले गोर बंजारा साहित्य संमेलनही त्यांनीच घडवून आणले. शिवाय अ. भा. तांडा सुधार समिती या पुरोगामी विचाराच्या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या संघटनेने सुरू केलेल्या विद्यार्थी दत्तक योजनेचा लाभ आज बावन्न विद्यार्थी घेत आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांचे प्रबोधनकार्य सुरूच होते. आक्षेपकांना आणखी कोणतं प्रबोधन अपेक्षित आहे ? 
        तांड्यात आश्रयाला येणार्‍या सर्व जातिधर्मियांना आपलसं करणार्‍या गोरधाटीला आपण आपल्या असल्या वर्तनाने, आचरणाने सुरुंग तर लावीत नाही ना? याचा विचार होणे ही काळाची गरज आहे. तमाम भटक्या-विमुक्तांसह गोर बंजारा समाजाला उत्थानाच्या दिशेने घेऊन जाणार्‍या डाॅ. प्रकाश राठोड नावाच्या इहवादी प्रबोधनकाराला समजून घेतलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे.
    तिसरा आक्षेप संमेलनाध्यक्षांच्या साहित्याची समीक्षा बहुजन आणि बहुजनेतर साहित्य वर्गाने केली आहे काय?
    "समीक्षा" या शब्दाचा अर्थ "विश्लेषण" असा होतो. "मराठी शब्दबंधानुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषाचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय. "समीक्षेच्या परिभाषेनुसार समीक्षण अपेक्षित असतं."सोयीचे सारे अपुले" हे अभिजन साहित्याचे ब्रीद. या ब्रीदाच्या पूर्ततेसाठी  त्यांची लेखणी राबत असते. डाॅ. प्रकाश राठोड यांच्या साहित्याची समीक्षा अभिजन वर्गातील लेखकांकडून होईल अशी आशा बाळगणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात वावरणे होय. डॉ. यशवंत मनोहर, प्रमोद वाळके, डाॅ. मनोहर नाईक, डाॅ. सर्जनादित्य मनोहर, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ.  अक्रम पठाण, डॉ. संदीप गायकवाड, प्रा. ताराचंद चव्हाण (सर्व नागपूर) डाॅ. रमेश राठोड अशा अनेक प्रख्यात इहवादी विचारवंतांकडून ती झालेली आहे. गोर बंजारा समाजाच्या साहित्य प्रांतात सतत असलेला समीक्षेचा दुष्काळ अलीकडे संपल्याची चिन्हे दिसत आहेत. डाॅ. प्रकाश राठोड, यापूर्वी नामोल्लेख झालेले डाॅ. रमेश राठोड ही नावे समीक्षेच्या संदर्भात आवर्जून घेता येतील. काही प्रतिभावंत"पुस्तक परिचय"ला समीक्षा समजून लिहीत राहिले. कुणीतरी कान टोचल्यानंतर "समीक्षाकार" ऐवजी "समीक्षक" लिहायला लागले. तो पर्यंत जी शोभा व्हावयाची ती झालीच.वैचारिकतेत अंतर्विरोध असल्यामुळे की डाॅ. प्रकाश राठोड यांची ॲलर्जी असल्यामुळे की डाॅ. प्रकाश यांची भाषाशैली त्यांच्या आकलनशक्तीच्या कुवतीपलीकडील असल्यामुळे हे प्रयत्न झाले नाहीत हे ते स्वनामधन्य प्रतिभावंत जाणोत. एके दिवशी डाॅ. प्रकाश राठोड यांच्या गोर बंजारा समाजाला शोषकांच्या शोषण नरकातून बाहेर काढण्यासाठी धडपडणार्‍या क्रांतिशब्द रत्नांची मराठी साहित्यविश्वाला दखल घ्यावीच लागेल. वशिल्यामुळे नव्हे तर क्रांतिदर्शी साहित्यामुळे. वशिल्याने केली गेलेली समीक्षा कौतुकाचे ढोल बडवीत असते. अशी समीक्षा वांझ असते. सूर्याला साक्षीदाराची गरज नसते. तो स्वयंभू असतो.

    चौथा आक्षेप, अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनामध्ये माजी संमेलनाध्यक्षांची काहीही भूमिका नसते का? त्यांच्याशिवाय संमेलनाध्यक्षांची निवड योग्य आहे का?
    हे आक्षेप नाममहिमा मंडनासाठी झालेले आहेत, हे लपून राहिलेले नाही.गोर बंजारा साहित्य संघाकडून वाशिम येथे होणार्‍या अखिल भारतीय गोर बंजारा तिसरे साहित्य संमेलनाची घोषणा दीड वर्षापूर्वी झालेली आहे. संमेलनाध्यक्षांची निवड एक वर्षापूवी झालेली आहे. हा कालावधी लक्षात घेता माझ्या वरील विधानाला पुष्टी मिळते. मुळात या लेखात नमूद आक्षेप साहित्य संमेलनाची निमंत्रणपत्रिका प्रकाशित झाल्यानंतर झालेले आहेत. निमंत्रणपत्रिका अवलोकनानंतर सहज लक्षात येतं, की आक्षेपकर्त्याची साहित्य संमेलनासबंधी सुप्त इच्छा काय आहे हे साहित्य क्षेत्रात वावरणार्‍यांच्या सहज लक्षात येतं. आक्षेपकर्ते डाॅ.अशोक पवार हे लेखक आहेत. गोर बंजारा समाजाचा इतिहास अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत. गोर बंजारा समाजाच्या इतिहासलेखनात त्यांचं योगदान आहे. मग माझ्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, की साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून हा आटापिटा का? हे खरे असेल, तर प्रोफेसर डाॅ.पवार कुठेतरी काहीतरी चुकत आहेत. साहित्य संमेलन पत्रिकेतच काय कुठल्याही पत्रिकेत नाव असणं म्हणजे ख्यातीप्राप्त व्यक्तीमत्त्व असणं नव्हे. व्यक्तीचं कर्तृत्व व्यक्तीला ख्याती प्राप्त करून देत असतं. गगन उंची प्राप्त करून देत असतं. साहित्य संमेलन पत्रिकेत नावाचा समावेश असण्याची गरजच काय?असं माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं. असामान्याचं काय? त्यांचं तेच ठरवोत.
    डाॅ. सुनीता ताई राठोड-पवार ह्या तुमच्या खर्‍या अर्थाने सहचारिणी. गोर बंजारा समाजाचा गौरव. अभिमान. लेखिका. अनेक पुरस्कारांनी सन्मानित. साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीत माजी संमेलन अध्यक्षांची काही भूमिका नसते का? त्यांच्या अनुमतीशिवाय साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड योग्य आहे का? असे अनाकलनीय आणि तथ्यहीन प्रश्न उपस्थित करून डाॅ. सुनीताताईंना निरर्थक वादात ओढून  आपण त्यांना बोन्साय करीत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? नम्रपणे सांगू इच्छितो मला तसं वाटतं अन्  वाईटही वाटतं.
    साहित्य संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेत मावळत्या संमेलनाध्यक्षांची काही भूमिका नसते का? या प्रश्नाचं उत्तर गोर बंजारा साहित्य संघाचे अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी वस्तुनिष्ठपणे चांगल्या प्रकारे देऊ शकते. गोर बंजारा साहित्य संघाचे अध्यक्ष प्राचार्य ग. ह. राठोड आहेत. बंजारा समाजाचा मान-सन्मान, अभिमान ! फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा नेक वारसा.
त्यांना गोर बंजारा साहित्य संघाची संहिता माहिती नाही असे कसे म्हणता येईल? साहित्य संमेलनाध्यक्ष निवड निकषानुसार झाली असावी असे वाटते. जवळचे नातेवाईक म्हणून निवड झाली असे म्हणणे हास्यास्पद वाटते. आक्षेपकर्त्याच्या विचारशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासाठी वाव असल्यासारखे वाटते. आपण एक वर्षापूर्वी लेखी आक्षेप नोंदविले असते, तर समाजात चिंतन, विचारमंथन घडून आले असते. शुद्ध नवनीत निघालं असतं. पण आपण आलात अवकाळी पावसासारखे. असं येणं बरं नसतं राजा! त्यामुळे दुसर्‍याच्या दारी चहा, पोहे नाष्ट्यावर पहाट साजरी करणारे नि सायंकाळी चमचमीत नळीच्या रस्स्याच्या पाहुणचारावर ताव मारणारे सुखावतीलही; परंतु समाजातील सत् प्रवृत्तीची माणसे दुखावतात. समाजहितैषी कार्यकर्त्यांचा उत्साह मावळतो. सामाजिक, सांस्कातिक अभिसरणाची गती मदावंते. हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. समाज काही काळ मागे जातो. त्याला चुकीचे निर्णय जबाबदार असतात.
     अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत माजी अध्यक्षांचे मत विचारात घेतले जाते असे कुठेही ऐकिवात नाही. वाचनात नाही. कारण ती निवड निवडणुकीद्वारे होते. गोर बंजारा साहित्य संमेलनासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात नाही. तसेही गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनी आपल्या एक वर्षाच्या कालावधीत साहित्य संवर्धनासाठी कोणते उपक्रम राबविले? किती दिवे लावले? किती मालवले? हा संशोधनाचा विषय. सर्व मावळत्या अध्यक्षांच्या बाबतीत निराशाच पदरी पडते. केवळ अध्यक्षपदाची रिकामी सूत्रे सोपविण्याचा सोपस्कार पार पाडला जात असतो. असा आनंदी आनंद असेल तर नावासाठी रुसायचं कशाला? झगडायचं कशाला? इतिहासात नोंद होते म्हणून?असं असेल तर गोर बंजारा साहित्य क्षेत्राला भवितव्य नाही.
     वंदनीय मोहन गुणाजी राठोड "भीमणीपुत्र"या टोपण नावाने गोर बोलीभाषेत लेखन करतात. बंजारा गोर बोली साहित्याचे अध्वर्यू .गोर बोली भाषेवर त्यांचे विशेष प्रेम आहे. प्रभुत्व आहे. त्यांचा वाचन व्यासंग खूप दांडगा आहे. गोर बोली भाषा व्याकरण हा त्यांचा लेखन प्रांत. कथा लेखन सुध्दा त्यांनी केले आहे.त्यांची कथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमाला आहे. ही त्यांच्या सकस दर्जेदार लेखनाची पावती आहे. त्यांनीदेखील गोर बंजारा साहित्य संघाद्वारा आयोजित अखिल भारतीय गोर बंजारा तिसरे साहित्य संमेलन, वाशिमच्या संदर्भात आपलं मत समाज माध्यमांवर नोंदविलेलं आहे."गोर बंजारा साहित्य संमेलन अध्यक्ष गोर बोली भाषेशी इमान राखणारा असावा" हे ते मत. भीमणीपुत्र गोर बोली प्रेमापोटी असं ते बोलले असावेत. त्यात वावगं काही नाही. त्यांचं मत योग्यच आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो, की गोर बोलीभाषेशी इमान असण्याचे निकष कोणते? ते त्यांनी विशद करण्याची तसदी घेतली नाही. तसे केले असते तर पुढील प्रश्न निर्माण झाले नसते. संमेलन अध्यक्षाबाबतचे त्यांचे हे मत एक वर्षापूर्वी समाज माध्यमांवर झळकले असते तर त्यांच्या मतांवर विचारविमर्श करता आला असता. संमेलन अध्यक्ष निवडीचा मार्ग सुकर झाला असता. साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड एक वर्षापूर्वी झालेली आहे. हे ही अवकाळी येणं. असो. प्रश्न असा आहे, की गोर बोलीभाषेशी इमान राखण्याचे थर्मामीटर कोणते? मापदंड कोणते? फूटपट्टी कोणती? हे इमान ठरवायचे कसे? मराठी नागर(प्रमाण) भाषेत वा इतर भाषेत उदा. हिंदी, तेलगू, कानडी, गुजराती तमीळ मल्याळम् इ.भाषेत लेखन करणार्‍या गोर बोलीभाषेशी असलेले नसलेले इमान कसे ठरवायचे? त्यांचं लेखन विपुल आहे. माणसं जोडणारं आहे. माणसं घडवणारं आहे. त्यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवू नये काय? या विषयी प्रज्ञावंत भिमणीपुत्र यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ही सादर विनंती. जेणेकरून पुढील साहित्य संमेलन आयोजित करणार्‍या साहित्य संघटनांना या मताचा विचार करून साहित्य संमेलनाला गोर बोलीभाषेशी इमान राखणार्‍या अध्यक्षाची निवड करता येईल.
     पण,मला भीमणीपुत्र यांना त्यांच्या वयाचा आदर ठेवून विचारावेसे वाटते, की वंदनीय मा. अंबरसिंग चव्हाण भाऊ(माझे जवळचे नातेवाईक नाहीत. वैचारिकदृष्ट्या काळजातले निश्चित आहेत.) जातीनिहाय जनगणना व्हावी याकरिता आपल्या इतर साथींना सोबत घेऊन मागील कित्येक वर्षांपासून योद्ध्याप्रमाणे किल्ला लढवीत आहेत. त्यांचे या विषयी समाज माध्यमांवर शे-दोनशे स्फूट लेख झळकले असतील. त्यांचे बहुतांश लेख हिंदी भाषेत आहेत. यदाकदाचित पुढे त्यांची निवड  साहित्य संमेलन अध्यक्षपदी झाली तर ते गोर बोलीभाषेशी इमान राखत नाहीत असे म्हणता येईल काय?
    अरूंधती राॅय ही बंगाली लेखिका. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कादंबरीकार."द गाॅड ऑफ स्माॅल थिंग्ज"(The God of small things)ही त्यांची पहिलीच साहित्यकृती. "बुकर" पुरस्कार प्राप्त. अपर्णा वेलणकर यांनी मराठी भाषेत अनुवाद केलेली. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मूळ लेखिका बंगाली भाषिक. बंगाली ही त्यांची मातृभाषा. कादंबरी लेखन इंग्रजी भाषेत. अरूंधती राॅय यांनी इंग्रजी भाषेत लेखन केल्यामुळे त्यांना बंगाली बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे एकिवात नाही. वाचण्यात आले नाही. दूरदर्शन वार्ता वाहिनीवरून ऐकल्याचे आठवत नाही. त्यांना बंगाली भाषेचा अभिमान नाही. तिचे बंगाली भाषेशी इमान नाही असे मानायचे काय? तर मग गोर बोलीभाषेसाठी हा अट्टाहास का? जग मंगळावर सफरीसाठी तयारी करत असताना गोर बंजारा समाजाने इमान, बेईमान यातच अडकून पडायचे काय?
     गोर बोलीभाषेतील साहित्यविश्वात "अनुवाद" प्रांतात शुकशुकाट आहे. प्रा. दिनेश सेवा राठोड यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांनी भीमणीपुत्र यांच्या काही साहित्यकृती इंग्रजी भाषेत अनुवादित करून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचविण्याचे महान क्रांतिकार्य केले आहे. गोर बोलीभाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख प्राप्त करून दिली आहे. गोर बोलीवर प्रभुत्व असलेल्या साहित्यिकांनी
 मराठी भाषेत लेखन करणार्‍या साहित्यिकांच्या साहित्यकृतिचे गोर बोली भाषेतअनुवाद करण्याच्या क्रांतिकार्याचा ओनामा केला तर मराठी प्रमाण भाषेतील अनेकानेक दर्जेदार साहित्यकृती बंजारा समाजाला बहाल करता येणार नाहीत का? अनुवाद प्रांतात प्रवेश करून हा दुष्काळ संपविता येणार नाही का? मराठी भाषेत लेखन करणारे गोर बंजारा प्रतिभाप्रज्ञावंत "गद्दार" आणि गोर बोलीभाषेत लेखन करणारे "खुद्दार" हे तत्त्व गोर बोलीभाषेत लेखन करणार्‍या स्वनामधन्य साहित्यिकांनी स्वीकारलेले आहे का? इ. प्रश्नांवर गोर बंजारा समाजातील प्रतिभावतांनी चिंतन करावं असं प्रामाणिकपणे वाटतं.
     सारांश, समाजहितासाठी राबविल्या जाणार्‍या कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये नावाच्या दाव्याचा, श्रष्ठ-कनिष्ठतेचा, हारतुर्‍याचा, शाली-पालीचा, मानापमानाचा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता ज्यांना कळतं त्यांनी शिक्षकरूपाने, कार्यकर्त्याच्या रूपाने समाजाला सर्वस्व बहाल करावं. वर्तमानात समाजाच्या पुढ्यात अंधार वाढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. हे बंजारा समाजातील प्रतिभावंतांनी कुठेतरी थांबविणे ही काळाची मागणी आहे. गोर बंजारा समाजाने सार्वजनिक उपक्रमाबरोबर आगामी पंचवीस वर्षे  शिक्षणाला वाहून घेतलं पाहिजे. प्रत्येक कुटुंबातील निदान एक तरी व्यक्ती शासकीय सेवेत असला पाहिजे. गरिबीवर हाच रामबाण उपाय आहे. त्याशिवाय संस्कृती संपन्न, समृद्ध होणे नाही."संस्कृती- संस्कृती म्हणजे तरी काय असते..माणसातील पशू माणसाळण्यासाठी अविरत, निरंतर केलेल्या प्रयत्नांची शृंखला."(चंद्रकांत वानखडे, गांधी मरत का नाही, पृष्ठ क्रमांक १५२, परिच्छेद तिसरा)
     अखिल भारतीय गोर बंजारा तिसरे साहित्य संमेलनाध्यक्ष डाॅ. प्रकाश राठोड आपल्या क्रांतिशब्दातून माणसातील पशू संपवून सर्वांगसुंदर माणूस निर्माण व्हावा यासाठी निरंतर, अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अशी माणसं डोळ्यात तेल घालून जपली पाहिजेत. नको ती राख डोक्यात घालून न घेता गोर बंजारा  समाजाच्या पिढ्या बरबाद करणारे वेगवेगळ्या रंगाचे शेले गळ्यात न मिरवता क्रांतिकारी सेवालाल महाराजांच्या विचारांना डोक्यात घेऊन आगामी पिढ्यांच्या उड्डाणासाठी त्याच्या पंखात नवे बळ बहाल करू या.
    "मुझमे हजार खामियाॅं है माफ किजिए!
    मगर अपने आईने को भी तो साफ किजिए!"
हे व्हावं यासाठी समाज माध्यमांवर झडत असलेल्या चर्चा वाचल्यानंतर माझ्या मनात उठलल्या विचार तरंगांना वाट मोकळी करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न मी केला आहे. मी गोर बंजारा साहित्या संघाचा सदस्यही नाही. परंतु चांगलं घडून यावं, एका चांगल्या घटनेच्या मार्गातील आकसपूर्ण अवरोध दूर व्हावेत हीच या लेखनामागील माझी प्रांजळ धारणा आहे.
   _________________________________
          प्राचार्य, एन. पी. चव्हाण, 
     मु. एकांबा, ह. मु. नवीन सोनखास,
           मंगरूळपीर. जि. वाशिम.
                दि. २१ मे २०२२

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...