Saturday, February 11, 2023

सेवाध्वज स्थापना

*पोहरादेवी येथे संत सेवालाल सागर संग्रहालय व ऐतिहासिक सेवाध्वजाची स्थापनाः*
*संत सेवालाल महाराजांची विख्यात भविष्यवाणी "मार पालेर खुटा मच रोपलीव''* 
                                          
------------------------------------------------
 ( *लेख विस्तृत आहे.. जरूर वाचा*)
*- डॉ. दिनेश सेवा राठोड*
              (वसंतकार)
----------------------------------
*दि. 03 डिसेंबर 2018 ला संत सेवालाल नंगारा वास्तू  भूमिपूजन सोहळा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमाची कायम नोंद लेखनीतुन व्हावी म्हणून "हुंमाळो नंगारारो" ही ISBN कृत स्मरणिका (Souvenir)  संपादित करण्याचे भाग्य मला लाभले. श्री. तेजुसिंग पवार साहेब (अप्पर जिल्हाधिकारी) यांनी "नंगारा घर " व "संत सेवालाल सागर संग्रहालय " प्रकल्प अभ्यास अहवाल  स्मरणिकेत प्रस्तुत केला. त्यातील उल्लेखनीय बाबी ह्या संपादित केलेल्या स्मरणिकेतील माहितीच्या आधारे  बणजारा समुदायाची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, "नंगारा सादृष्य वास्तू " व "संत सेवालाल सागर संग्रहालय" या विषयी बणजारा (बंजारा) समुदायाला पुनश्च वाचता यावे म्हणून सेवाध्वज ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तुत बाबीवर संपादित लेखातुन प्रकाश टाकण्याचा माझा काहीसा प्रयत्न..*
आपल्या उद्यमशीलता व कल्पकतेच्या बळावर जगाला विस्मयीत करणारी "हरप्पा संस्कृती" (Harappa Civilization) चे निर्माण करणारा बणजारा (बंजारा) समुदाय, मा. रामसिंगजी भानावत, मा. बळीराम पाटील, मा. फुलसिंग नाईक व मा. वसंतरावजी नाईक अशा अनेक समाज सुधारकांच्या शिकवणीतून मार्गक्रमण करणारा बणजारा समुदाय,  इतिहासकाराच्या संशोधनाने हरप्पा उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हे बणजारा बांधवांच्या सांस्कृतिक- सामाजिक जिवनासी पुर्णत: साधर्म्य असल्यामुळे व निरिक्षणांच्या आधारावर ती पुर्णउन्नत संस्कृती ही गोर बणजारा संस्कृती असल्याचे  सिद्ध होते. काळाच्या ओघात Gypsy म्हणजे भ्रमंती-भटक्या अवस्थेला बणजारा समुदाय पोहोचला. परंतु आपल्या पुरुषार्थाने या कालगतीवर मात करून आपल्या चिकाटी, सकारात्मकता, व्यापार-व्यवहार कौशल्य वगैरे गुण संपदेच्या बळावर बणजारा गण समूह केवळ उदरभरणासाठी भटकंती करणारा न राहून इतर हजारों भटक्या समुदायांच्या वनगर्दीमधून स्वतंत्र वाट चोखाळत "व्यापारी घुमकड" (Trader Nomads) अशी स्वाभीमानी ओळख निर्माण करून समाजाच्या मुख्यप्रवाहात अधिराज्य गाजविणाऱ्या तथाकथित सभ्य वर्ण व वर्गश्रेष्ठांच्या भारतीय (अळणी पडून असलेल्या) समाजाला तथा भारता बाहेरच्या कित्येक देशांना (ग्रीकला जोडणारा ऐतिहासीक "लवण-मार्ग" हा त्याचा जिवंत पुरावा आहे.) गाई-गुरांच्या पाठीवर लदेणी द्वारे समस्त अन्नरसांचा राजा अर्थात "लवण" (मीठ) पुरवून या बिरादरीने आपल्या महत्वपूर्ण योगदानाद्वारे कालपटलावर आपल्या अस्तित्वाची अमीट छाप सोडली आहे. गोर बणजारा गण समुदाय हा हजारों भटक्या समुदायाच्या गर्दीत स्वतंत्र वाट चोखळत 'व्यापारी अशी स्वाभिमान ऐतिहासिक ओळख निर्माण करणारा, एकेकाळी भारतीय अर्थव्यवस्थेला विकासाचा मुलाधार, विज्ञान व मानवतावादी विचार अंगीकृत असलेला हा बणजारा समुदाय आहे. कालांतराने या शूरवीर व कार्यतत्पर समुदायाला लदेणीचे, तांडा भटकतीचे जीवन वाट्यास आले. 
परंतु इंग्रजांसोबत आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने संपूर्ण भरतखंडासोबतच (श्रमावर आधारित पारंपरिक कामे हिरावून) भारतमातेच्या या "व्यापारी" बणजारा भटक्या लेकरांचे "व्यापारी' हे बिरूद हिराऊन घेऊन त्यांना "भटक्या अवस्थेत ठकलले ज्ञात असो की, आगगाडीच्या आगमनाने या वन-बिरादरीच्या व्यापारी असतित्वाला खरोखरचा वणवा लाऊन बणजारा समवेत अन्य भटक्या जमातीला पुर्णार्थाने अनिकेत, भटके जिणे प्रदान केल्या गेले. इंग्रजी राजवट प्रस्थापित होण्यापूर्वी सुध्दा इतिहासाच्या विविध वळणांवर बणजारा जमातीने व तिच्या कुशीत संगोपीत झालेल्या अनेक सुपुत्रांनी आपल्या शौर्याचा व कलागुणांचा एकमेव व द्वितीय असा परिचय करून दिला आहे. आला-उदल चे शौर्य व बाबा लक्खीशा, गोविंद गुरुचे बंजारांचे अभूतपूर्व बलीदान भारतमातेच्या सपुतांच्या शौर्यामध्ये अग्रस्थानी विराजीत आहे. मुघल सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर मुघल सैन्यांना अन्न-धान्याची कुमक पुरविण्याची जबाबदारी बणजारा बांधवांनी ज्या कार्यकुशलतेने पार पाडली ती कार्यकुशलता मुघलकाळाने अंत्यत आदराने नोंदविलेली असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. या शिवाय सुल्तान अल्लाउद्दीन खिल्जीच्या "बाजार नियमन व्यवस्था" (Market Regulation System) च्या यशाचे गमक हे त्यांनी बणजारा बांधवांच्या नगर-बाजारांना (City Markets) धान्य पुरविण्याच्या किमयेवर टाकलेल्या विश्वासात दडलेले होते, अशी इतिहास ग्वाही देतो. मग निश्चितच प्रश्न पडतो की, एकेकाळच्या अशा शुरवीर कार्यतत्पर समाजाच्या नशिबी असे भटकंतीचे, लदेणीचे, गुरांढोरांवर जिणे जगण्याचे, मग कालांतराने दऱ्याखोऱ्यात वसाहतीचे व तांडा राहूटीचे भन्नाट व बिभत्स जिने कसे आले? उत्तर अर्थातच लेख-प्रपंचाच्या प्रवर्तक विधानामधेच दडलेले आहे. डोळे दीपविणारी उन्नती व विकास व मागोवा घेत चोरपावलानी येणारी अवनती हे मानवी जीवनाच्या रहाटगाड्याला विळखा घालून बसलेले दोन अगम्य व गुह्य असे अनादिकाळापासूनचे नियती-नियम आहेत आणि काळविराने निर्माण केलेल्या या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठीच भूतलावर क्रांतिकारी व शौर्यवान संत पुरुषांचे अवतरण होत असते. जेव्हा-जेव्हा मानवी समाज आत्मविस्मृत आत्मसन्मानरहित होऊन त्याला ग्लानी येते तेंव्हा तेंव्हा सज्जनांच्या रक्षणार्थ व दुष्प्रवृत्तीच्या विनाशार्थ सत्पुरुषाचे पृथ्वीवर अवतरण होते. बणजारा समुदायात संत सेवालाल महाराजाचे अवतरण ही त्याचीच प्रचिती म्हणता येईल. 
भारत देशात जवळपास 14 कोटी बणजारा समाज 16 राज्यांमध्ये विखुरलेला असून त्यांची भाषा, पेहराव, संस्कृती जगावेगळी आहे. या संस्कृतीला हजारो शतकांचा गौरवशाली इतिहास आहे. बणजारा समुदायामध्ये संत सेवालाल महाराज हे क्रांतिकारी आणि विज्ञानवादी विचाराचे व द्रष्टे समाजसुधारक होय. आपल्या अमृततुल्य विचारातुन, गोर बणजारा समाजच नव्हे तर बहुजन, भटक्या  समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेले, अंधश्रद्धेच्या जोखडातून  बाहेर काढत तमाम गोर बंजारा समाजाला क्रांतिकारी विचारांची त्यांनी शिकवण व जीवनाची दिशा दिली. जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची ही पावनभूमी व समाधीस्थळ म्हणजे पोहरादेवी (पोहरागड), देशातील गोरबंजारा समाजाचे फार मोठे प्रेरणास्थान- श्रद्धास्थान म्हणून पोहरागड, उमरीगड या तिर्थक्षेत्राची  ख्याती जगभर आहे. 
अर्थात जीवांना आंतर- यात्रा करावयास लावणारी अनंत पुरुष- रत्ने ही मानव समुहांना काळाची गरज म्हणून  दीपस्तंभासारखे मागदर्शक म्हणून त्या त्या वेळी उभी राहतात. अहंकार, मद, दंभ, लोभ, इत्यादी विकारांनी ग्रस्त सत्तेविरुध्द पुज्यनिय शिख-गुरूंसारखे, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, भूषणीय संत सेवालाल महाराजांसारखे लढत असतानाच, संसाराच्या दारूण दुःख व भयांनी होरपळून निघालेल्या आपल्या अनुयायांना व अनंत अनंत भावी पिढ्यांना ते आपल्या युग- संदेशाद्वारे शांती व आनंदाचं पथदर्शन घडवित असतात. प. पू. संत सेवालाल बापूंसारख्या नररत्नांच्या स्मृती कायम ठेवण्याच्या उद्देशाने अशा पुरुषश्रेष्ठांच्या दिव्य आयुष्यातील अद्भुत व अलौकीक नवघटनांची प्रेरणास्पंदने चिरकाल साठविण्याच्या हेतूनेच कुठे समाधी स्थळे तर कुठे स्मृती स्थळे उभी राहतात. भविष्यात मग कोणी अध्यात्मिक अभिप्सा घेऊन अशा स्थळांवर येऊन नतमस्तक होतात तर कोणी त्यांच्या शौर्य व कतृत्वगुणांनी आत्मप्रेरीत होण्यासाठी अशा भूमिचे प्रयटन करीत असतात. देशभरातील बणजारा बांधवही या मनुष्यकोटीतील क्रिया कृतींना निश्चितच अपवाद नाही. तोही कालमानपरत्वे कधी धर्म, वर्ण, वर्ग, प्रातांच्या सिमा ओलांडून समस्त विश्वमानवांना दंडवत प्रणाम करतो तर कधी स्वार्थी होऊन, उपकृततेने प्रेरीत होऊन मा. वसंतरावजी नाईकांसारख्या महामानवाच्या अंत्येष्टी स्थळावरची रक्षा अतीव श्रध्देने यज्ञकुंडावरची विभूती एखाद्या श्रध्दाळू जीवाने नेत्रबंद होऊन बेमालूमपणे जिभेवर टाकावी तसी क्षणात नामशेष करतो, तर कधी आपले पूर्वज श्रेष्ठ संत श्री सेवालाल महाराजांच्या शौर्य, क्रांतिकारी, पावित्र्याचं व द्रष्टेपणाचं स्तवन करण्याकरीता व त्यांना श्रद्धा सुमनांची आदरांजली वाहण्याकरीता हजारो किलोमीटरची लगबग करीत देशातील बंजारा समुदाय पोहरादेवी नावाची त्यांची 'काशी' गाठत असतो. 
मानवातील ब्रम्हरूपातील अव्यक्त पूर्णत्व अविष्कृत करणे हाच मानवी जीवनाचा उद्देश आहे. हे अंतःकरणातील दिव्यत्व व्यक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे धर्म, उपासना, संप्रदाय निरपेक्ष असून मानव प्राण्यात मनुष्यत्वाचा विकास घडवून आणणारे हे मानवातील मानवेतर प्राण्यामधे नसणारे वैशिष्ट्य, स्वातंत्र्य आहे अशा धर्माचे अवलंबन मानवी जीवनामधे व्हावे यासाठी साधू-संतांचे जीवन हे प्रेरक, मार्गदर्शक व आशिर्वादरूप असतं. याच भावनेने संत सेवालाल महाराज यांचा आदर्शवत वारसा बणजारा समुदायाला मिळाला. आज समाज बदलत्या प्रवाहा बरोबर "तांडा"" च्या रूपाने स्थिरावला अशातच गोर बणजारांच्या आत्मसन्मानार्थ, लक्षणार्थ व दुष्ट प्रवृत्तीच्या विनाशार्थ प. पू. समाज सुधारक संत सेवालाल महाराज जन्माला आले. दीपस्तभा सारखे मार्गदर्शक म्हणून त्यांचा "आदर्शवत ठेवा" याची जपवणूक करून आज प्रत्येक गोर बांधव मार्गक्रमण करतोय. संसारातील भटकंतीच्या दुःखाने  होरपळून निघालेल्या आपल्या गोर बांधवांना आपल्या युग संदेशाद्वारे शांती व आनंदाचे दर्शन संत सेवालाल बापूनी समाजाला घडविले. 
*"बणजारा काशी-पोहरादेवी"* ही विदीर्ण व ओशाळलेली एका संतश्रेष्ठाच्या समाधीस्थळाची दुरावस्था विदीर्ण व ओशाळलेले धर्म जीवन दर्शवित होती. देशभरातील बणजारा बांधव आभाळ फाटलेल्या त्यांच्या जिवनासारखीच अवस्थाप्राप्त त्यांच्या पोहरादेवी या काशी क्षेत्री येऊन उघड्या आभाळाखाली त्यांच्या काशीची माती पाटीला लाऊन, विदीर्ण नजरेने त्यांच्या जिर्णोप्राय श्रध्दास्थळांना न्याहाळून होरपळलेल्या अवस्थेत परतत असे, तांड्या बेड्यावरच्या बणजारा समुदायाच्या फाटक्या जीवनासारखीच पावन बिरुदं प्राप्त या समाजाच्या तिर्थक्षेत्राची दुरावस्था झालेली होती. पोहरादेवी विकास प्रकल्पाच्या सुप्तावस्थेत दडलेल्या मा. मंत्री संजय राठोड साहेब यांच्या दैवी दृष्टीने ही बाब प्रामुख्याने घेरली व पोहरादेवी विकास प्रकल्प साकारण्याचे बळ संत सेवालाल कृपेने त्यांना मिळाले. संत  सेवालाल महाराज यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते की,
"मार पालेर खुटा मच रोवलीव!"
ही भविष्यवाणी खरी ठरविण्याचा ऐतिहासिक योगायोग मां.संजयभाऊ राठोड यांनी प्रत्यक्षात आणले. अशा या गोर बणजारा समाजाच्या महान संताचे पावन समाधी स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी सर्व गोर बणजारा समाज बांधवांची इच्छा होतीच. या नात्याने विकास आराखडा तयार करण्याची संधी भाऊंना मिळाली. ते दैवी संकेतच म्हणता येईल. त्यानुसार पोहरादेवी तीर्थ क्षेत्राचा विकास आराखडा तयार करून शासकीय  मान्यतेसाठी सादर केला. आज १२ एकर जागेत ही ऐतिहासिक वास्तु उंच व दिमाखात उभी राहीली .
बणजारा बांधवांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी, समाज विकासाची कोणतीही कास न धरलेली काशी, अर्थात पोहरादेवीच्या विकासाचा विषय मा. संजय भाऊ साठी अग्रक्रमावर होता. अशा दिव्य कल्पकतेतुन पोहरादेवी विकास संकल्पनेला आज मूर्तरूप प्राप्त होत आहे. अशा अनगिनत सृजन कल्पनांनी उक्त व निश्चितच या अलौकिक विचारगर्दीतूनच प्रकल्प परिकल्पना व प्रकल्पपूर्तीची सुंदर पहाट लखलखाखून आज जगासमोर उभी झालेली आहे. त्याचा उद्गम व विकास मा. संजय राठोड यांच्या रचनात्मक विकास कार्याच्या तळमळीतून व अनेकांच्या सृजन कल्पनेतून उदयास आलेला आहे यात शंका नाही. याच ध्येयाने प्रेरित होऊन सार्वजनिक धर्मजीवन जगण्याची मानवमात्राला प्रेरणा मिळावी यासाठी क्रांतीसुर्य- प. पू. श्री सेवालालजी महाराजांचे भव्य स्मारक म्हणून त्यांच्या अश्वारूढ पंचधातूच्या भव्य पुतळ्याची उभारणी व सेवाध्वज स्थापना समस्त विश्वातील बणजारा समुदाय या ऐतिहासिक घटनेचे आज साक्षीदार होत आहे. हे वर्तमान पिढीचे भाग्यच म्हणावे लागेल. त्याकरवी संत सेवालाल सागर संग्रहालय, नंगारा वास्तू व सेवाध्वज स्थापना सर्व गोर बणजारा समाजासाठी सुवर्णाक्षरात नोंदविणारी घटना ठरलेली आहे.  
देश व राज्याच्या सर्वंकश जडनघडनीमध्ये योगदान देताना हाडाची काडे व रक्ताचे पाणी करीत आलेल्या बणजारा समाज बांधवांचे अस्मीता- स्थान असणा-या पोहरादेवी या तिर्थस्थानासाठी; लदेणी तांडे व वस्त्यांवर नायक (गावप्रमुख तथा न्यायसभा प्रमुख), कारभारी (नायकांचा कृतीतस्पर व कर्तव्यपरायण सहाय्यक), नसाबी (न्यायसभेतील न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाची भुमिका वठविणारा नायकांचा अन्य एक महत्त्वपूर्ण सहाय्यक), हासाबी (न्यायपंचायती व इतर तांडा वर्गणीचा निधी संकलीत करणारा नायकांचा सहायक) इत्यादीद्वारा तांडापंचायतींच्या माध्यमातून वादातीत न्यायप्रणाली उभारून देशासमोर एक उत्तम अशी समांतर न्यायप्रदानाची लोकशाही पंरपरा ठेवणाऱ्या बणजारा समाजासाठी अनंत शौर्य गाथां द्वारे त्याग व बलीदानाची अखंड अशी लखलखती शृखंला निर्माण करून देशाच्या सामाजिक सांस्कृतिक नव इतिहास निर्मितीमधे मोलाचे योगदान देणाऱ्या बणजारा समाज बांधवाच्या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या त्यांच्या सांस्कृतिक स्मृतींना उजाळा देऊन त्यांना भावी पीढीसाठी जतन करून ठेवण्यासाठी मा. संजय राठोड साहेब यांच्या अथक प्रयत्नाने बणजारा समुदायाची सांस्कृतिक परीचय करून देणारी संग्रहालय नंगारा सादृष्य वास्तू व सेवाध्वज सत्पुरूषांचे खरे स्मारक ठरले आहे. द-या खोऱ्यात वास्तव्य करून उन, वारा, पावसासी तादात्म्य साधून, निसर्गाच्या पंचतत्वांशी पूर्णतः सांगड घालून त्यांना आपल्या संघर्षरत जीवनाचा सांगाती करून निसर्गाशी पूर्ण समरस झालेल्या "वनचरा" अर्थात बणजारा बांधवांचे जीवन दर्शन घडविणारे स्मृतीस्थान व स्थापित सेवाध्वज हा बंजारा समाजाचा सदा सर्वकाळी मानबिंदू राहणार आहे.
*पोहरादेवी येथे 170 कोटी निधीतून साकारतोय "संत सेवालाल सागर संग्रहालय" व "नंगारा घर" :*
भारताच्या पंजाब राज्याची राजधानी चंदीगडजवळील आनंदपूर साहिब या पवित्र शहरात "विरासत-ए-खालसा" हे शीख धर्माचे जे एक संग्रहालय आहे त्याच धरतीवर  पोहरादेवी ता. मानोरा जि, वाशीम महाराष्ट्र राज्य येथे निर्माण होत असलेले 105 फूट उंच वास्तू व समस्त महाराष्ट्रासाठी वास्तुशास्त्राचा आदर्श नमुना असेल असे "संत सेवालाल सागर संग्रहालय -नंगारा घर" (नगारा आकाराची वास्तू) या रूपाने बंजारा समाजाची दैदिप्यमान संस्कृती,  संपन्न इतिहासाच्या पाऊल खुणाचे जतन व संवर्धन केल्या जाणार आहेत अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन संत सेवालाल महाराजांचे कार्य, विचार नव्या पिढीपर्यंत संवर्धित करण्याचे कार्य या माध्यमातून संपन्न केल्या जाणार आहे व संस्कृती चे जीवंत आलेख हे वाचनालय व वस्तू संग्रहालयातील 12 गॕलरी मध्ये दृष्टीपटास येणार आहे. या वस्तू संग्रहालयामध्ये बंजारा संस्कृती व इतिहासाच्या प्रदर्शनासमवेत संत सेवालाल महाराज यांचा जीवनपट, संत डॉ. रामरावबापु महाराज यांची माहिती, स्वतंत्र विश्रामगृह, एक हजार लोकांना सामावून घेऊ शकणारे डोम कृत सभागृह, समाजातील समाजसुधारकाचे जिवंत भासणारे पुतळे, एकंदरीत बणजारा सांस्कृतिक माॕडेल व्हिलेज साकारले जात आहे. या माध्यमातून गोर बणजारांचा समृध्द इतिहास, भाषा, संस्कृती, लोकसाहित्य व लोकसंस्कृती साहित्यकांच्या प्रगल्भ विचारांची यात्रा वाचकांना, संशोधकांना व पर्यटकांना घडणार आहे. संत सेवालाल सागर संग्रहालयात आमच्या पूर्वजांचा संस्कारमुल्यांचा ठेवा असणारे अक्षर ग्रंथ असो वा सनातन संस्कृतीची साक्ष ठेवणारे परंपरागत अलंकार, वेषभूषा, सृजनाचा लेप असलेले जिवनोपयोगी व उत्सव उपयोगी साहित्य तथा सामुग्री जिसे बणजारा बांधवाचे लदेणीस उपयोगी असलेले त्यांनी स्वतः विणलेले गोणपाट (गुणी ): वैशिष्टयपूर्ण अशी अन्नगृहातली कास्य, पितळ व तांब्यांची भांडी, दैनंदिन जीवनात निगडीत प्राणी-सजावटीची वैविध्यपूर्ण आभूषणे, अलंकार व सामुग्री (जसे पलाश मुळाच्या तंतुनी विणलेले विविध वृषभ-सजावटीचे व कृषि तथा दैनंदिन वापरातले साहित्य) विवाह संस्कारांसी निगडीत बणजारा परंपरांची विशेष ओळख दर्शविणारा कोथळो (नवरदेवाचे साहित्य ठेवण्याची बंजारा माता-भगीनींनी विनलेली एक नक्षीदार पिशवी ) नवरदेवाच्या हातात दिल्या जाणारा एक पारंपारिक माला माता-भगिनी परिधान करीत असलेली स्वकल्पीत व स्वनिर्मीत अनंत नक्षीदार आभूषणे बंजारा मातांचा विशेष परीचय देणारा लेंगा (धागरो), चोळी (काचळी), केशभुषा, आभूषणे (आटी, चोटला, घुगरी, टोपली, आटी इत्यादि), वन्यजीवनाची स्मृती जागृत करणारी अनोखी व्यंजने "Typical Banjara Recipes" (जशी सळोई- प्राण्यांचे रक्त, आत इत्यादि प्राणी अंगाचे टाकाऊ पदार्थ व अवयवांपासून तयार करण्यात येणारी "Dish"); पोळपाट बेलण्याच्या तून उदयास आलेली बणजारा भगीनीच्या हातावर तयार होणारी चपाती *(पातळीबाटी)* तिजोत्सवानिमित्य उभारल्या जाणारे (आकाशाला गवसणी घालणारे) *"हिंदोळे"* व त्यावर गायली जाणारी कर्णमधुर गीते विवाह, जन्म-मृत्यू भेटी मुलाखती इत्यादि प्रसंगी व्यक्त होणारा आदीम भटक्या संस्कृतीचा सुर घेऊन बाहेर पडणारा *"ढावलो"* नावाचा मुलखावेगळा बणजारा हंबरडा इत्यादी वैविध्यपूर्ण परंपरा व जीवन छटा एकूणच भारतीय सांस्कृतिक धरोवराला अनोखा धनुष्यरंग अर्पण करतांना संग्रहालयात दृष्टीस पडेल. या व इतर अनेक अनोख्या बणजारा जीवन रस व रंगांचं प्रतिरूप व प्रतिबिंब या संग्रहालयात बघावयास मिळणार आहे.
 देश विदेशातील पर्यटकाला संग्रहालयातील प्रत्येक गॕलरीमधील प्रदर्शित माहितीचे ज्ञान अचूकपणे बणजारा, मराठी, हिंदी सह सात भाषांमधून एअरोफोनच्या audio-visual च्या इलेक्ट्रॉन माध्यमातून मिळण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. संत सेवालाल सागर संग्रहालय" व "नंगारा घर" या वास्तू केवळ मृतवस्तुंचे संग्रह करणाऱ्या विटा सिमेंटच्या इमारती सिद्ध न होता भावी पिढ्यांच्या संशोधक व अभ्यासबुद्धीला सचेत करणाऱ्या देशातील इतर अजरामर संस्कृती केंद्रांसारखेच जीवंत बंजारा कलाकृतींचे चिण्मय केंद्र म्हणून देशाच्या नकाशावर नव्याने उदयास आले आहे. 
आपल्या संघर्षाने पेटलेल्या, लदेणी व भटकंतीच्या जीवनाच्या भयावह यातना भोगत भोगत, कित्येक नैसर्गिक व भौगोलिक आव्हाने पेलत पेलत मुख्यप्रवाहाचे उबदार जीवन जगत असणाऱ्या अनेक भाषेची उपेक्षा व अपमानाचा अल्प परीचय करीत करीत स्वतःची जगावेळी "बोली" (dialect) विकसीत करून आपल्या हजारो-हजारो कल्पक व सृजन बोलीच्या शब्दांचा समुद्र तयार करून सहस्र बोली गीतांद्वारे जगभरातील भाषातज्ञांचे लक्ष आकर्षीत करणाऱ्या गोर बोलीचा ठेवा भावी पीढीसाठी जतन करणारे  संग्रहालय  अर्थात संशोधनासाठीचे वाचानालय-विद्यापीठच असणार आहे. आपल्या सणासुदीच्या अद्वितीय परंपरा व कलाकृतींनी मठलेले पोशाख, जीवन उपयोगी वस्तू व अलंकारांद्वारे जगभरातील वस्तु, अलंकार व पोशाखाच्या शैली योजणा-या व कल्पणा-या कलावंत तज्ञांना भूरळ पाडणा-या वस्तु व वस्त्रालंकारांसाठी संत सेवालाल सागर संग्रहालय आहे. ही बाब समस्त बणजारा बांधवांच्या मनाला नक्कीच हर्षित करणारी आहे. पाहिजे त्या प्रमाणात आतापर्यंतच्या कोणत्याही शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा इतिहास आहे.ज्ञात व अज्ञात अशा अनेक कारणांपैकी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे या तिर्थक्षेत्राच्या दयनीय अवस्थेचे प्रमुख कारण राहीलेले आहे. आधी मागासलेल्या बणजारा समाजाचा सर्वंकश विकास की पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा सर्वांगिण विकास हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांसाठी एक चिकीत्सेचा मुद्दा असू शकतो. परंतु या निमित्ताने बंजारा- काशी क्षेत्री जी विकास गंगा आणल्या जात आहे हे महत्त्वाचे आहेच. तसेच कोणत्याही राजकीय हेतूने सुद्धा हा प्रकल्प प्रेरीत नाही.  
२१ व्या शतकात  आधुनिक  भारताच्या नवतेचे स्वप्न पाहणाऱ्या एका अग्रणी व पुरोगामी राज्यासाठी लाखो जिवांची शेकडो वर्षांपासून चालत आलेली हेळसांड ही निश्चितच अभिमानाची बाब नाही ही दीन-होरपळ अनुभवायला निश्चितच बुध्दांकुर जिवंत असणाऱ्या मानवी मनाची आवश्यकता असते. मग ते मानवी मन समाजाच्या कोणत्या स्तरातून, जातीतून, संप्रदायातून व राजकीय पक्षातून येते हे महत्वाचे राहत नाही संबंध असतो तो संवेदनशील असण्याशी आणि अशी संवेदनशील मने आज या प्रकल्प साकारण्याच्या निमित्याने स्पंदित होतांना दिसत आहेत ज्यामध्ये समावेश होतो मा. संजयजी राठोड साहेब, समाजाचे समस्त बांधव व शेकडो प्राणप्रिय कार्यकर्त्ते, विचारवंत, साहित्यिक, साहेबांसोबत रात्रंदिवस एक करून प्रकल्प सिद्धीसाठी झटणारे मंत्री व अधिकारी यांच्या सहकार्याने "नंगारा सादृष्य वास्तू " व "संत सेवालाल सागर संग्रहालय" पूर्णत्वास आलेले आहे. एक साहित्यिक म्हणून संग्रहालयातील आवश्यक त्या गॕलरीला लागणारी ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती पुरविण्याची मला संधी मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. पोहरादेवी तिर्थक्षेत्राचे प. पू. बापूंच्या अमर अश्वावरून प्रचलित असलेले एक अन्य नाव बघता बघता महाराष्ट्राच्या सुखसुविधांनी युक्त अन्य तिर्थक्षेत्रांच्या पंक्तीत नेऊन बसवेल. बणजारा बांधवांसाठी पूर्णरूप इच्छूक मा. संजयभाऊ राठोड साहेब यांच्या चमुद्वारे कल्पीत व समन्वयीत हा Vision Project प्रकल्प निसंदेहपणे नवतेनी नटलेला राहणार आहे.  

*१२५ एकर भूमिवर वनपरिक्षेत्राचा विकास :*
संसार तापांनी पिंजून निघालेल्या व निरंतरच्या परिश्रमानंतरही दैन्य-दारिद्रयाचे जिवाची लाही-लाही करवणारे जीवन वाट्याला आलेल्या, देशभरातून आत्यंतिक श्रध्देने पोहरादेवी येथे पोहोचणाऱ्या तांडा पृष्ठभूमीप्राप्त भाविकांना घडी दोघडीचा आनंदाचा व आल्हादाचा विसावा मिळावा; या तिर्थाटनाच्या निमीत्ताने त्यांना नवी उमेद मिळावी, नवचैतन्याने लाभान्वीत होऊन ते स्वगृही परतावे, वनराई विकसीत होऊन ओसाड भूमीने हिरवा शालू परिधान करून या शक्तीपीठाच्या सौंदर्यात भर पडावी इत्यादी उदात्त हेतूंचा अंतर्भाव असलेला पोहरादेवी तिर्थक्षेत्र वनपर्यटन विकास प्रकल्प हा निसर्ग सौंदर्य व पर्यावरण विकासाचा प्रणव-नाद निनादणारा अत्यंत नाविण्यपूर्ण असा दुसरा प्रकल्प सुद्धा पोहरागडी वास्तवात उतरत आहे.
गतकाळच्या या विरान तिर्थक्षेत्री सुमारे १२५ एकर भूमीवर साकारलेले, दाट वृक्षवल्लींनी नटलेली नवविकसीत वनराई, हिरवेकंच आच्छादन घेऊन समस्त तिर्थयात्री व पर्यटकांना सजून, नटून थटून, नतमस्तक होत... नवचैतन्यांनी मंतरलेला "नवंरान" प्रदान करीत तिर्थक्षेत्र विकासाचा "नव-राग" आलापित समस्त तिर्थयात्री, पर्यटक तथा रामनवमीनिमित्त अलोट गर्दी करीत पोहरादेवी गाठणाऱ्या तमाम गोरबांधवांना खुशामत करीत आपल्याकडे खुणावत राहील. परंतू आजच्या हिरवळीचा पूर्वेतिहास अत्यंत रणरणता आहे. पोहरादेवी व लगतच्या वाईगौळ या दोन गावांच्यामधील वनविभागाच्या अखत्यारीतील १२५ एकरचा भूखंड दशकानुदशके ओसाड व वाळवंटी रूप धारण केलेले होते. परंतु पोहरादेवी विकास प्रकल्पाच्या पूर्ततेच्या निमित्ताने मा. संजय राठोड साहेब द्वारे पर्यटन विकासाची अभिनव कल्पना मांडण्यात आली. ज्याला त्यांच्या कार्यकर्तृत्वाने व वनविभागाच्या सहकार्याने आजचे हरितरूप प्राप्त होणार आहे. एकेकाळच्या वाळवंटी जमिनीचे आजचे लुसलुसीत व गोंडस Oasis मुरूद्यान रूप न्याहाळतांना आपल्याकडून जे परिश्रम घडले ते निश्चितच भरभरून फळाला आले आहे, असे बणजारा बांधवाला वाटल्याशिवाय राहणार नाही. 
काळ प्रवाहात बणजारा समाजाला जर आर्थिक उन्नतीचे व भरभराटीचे दिवस पहायला मिळाले असते तर त्यांच्या भटक्या जिण्याने त्याला बहाल केलेल्या विविधरंगी छटा मुख्यप्रवाहात परिणत होऊन त्यांनी त्या जगण्याला अतिशय रंगतदार व बहूआयामी केले असते ह्या अद्भूत चालीरिती मुख्यप्रवाहातील अनेक जाती संप्रदायांच्या सांस्कृतिक जीवनाच्या अविभाज्य घटक ठरून मोठ्या डौलाने व आदराने उभ्या राहील्या असत्या. तुलनेने कितीतरी कोरड्या व निरस वाटणा-या संपन्न  बांधवांच्या कित्येक चालीरिती ह्या मुख्यप्रवाहातील अनेक जाती समुदायांकडून आदराने स्विकारल्या गेल्या आहेत. भविष्याच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे हे तुम्हा-आम्हा सगळ्यांसाठी अनाकलनीय आहे. आजचा मुख्य प्रश्न ह्या दुर्लभ परंतु काळ- पडदयाआड लुप्त होऊ पाहत असलेल्या "सर्वांग सुंदर", "बहुरंगी" गोर संस्कृतीचे जतन करणे जे "नंगारा घर" व "संत सेवादास सागर वस्तु संग्रहालय" ह्या उदयोन्मुख बणजारा सांस्कृतिक केन्द्रांच्या माध्यमातून वास्तवात उतरणार आहे. संत  सेवालाल महाराज यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते की, “मार पालेर खुटा मच रोवलीव” ही भविष्यवाणी खरी ठरविण्याचा ऐतिहासिक योगायोग मां.संजयभाऊ राठोड यांनी प्रत्यक्षात आणले आहे. प. पू. श्री सेवालाल बापूंची विख्यात भविष्यवाणी "मार पालेर खुटा म रोपलीव'' अर्थात माझे इच्छीत कार्य मला वाटेल तेव्हा मला वाटेल त्या व्यक्तींच्या माध्यमातून मी पूर्ण करून घेईल." आणि पोहरादेवी येथे साकार होत असलेल्या वास्तुंच्या कल्पक निर्मीतीस निमित्त ठरणारे शिलेदार, कर्णधार ते म्हणजे मा. संजयभाऊ राठोड साहेबच होय. अनंत उलाढालीनंतर साकारत असलेल्या, शेकडो वर्षांपासून उपेक्षित व दुर्लक्षित असलेल्या तिर्थक्षेत्र पोहरादेवीचे भाग्योदय करणा-या "पुनरुत्थान् तथा विकास प्रकल्पाची" संकल्पना साकारण्याची, त्याचा आराखडा तयार करून शासकीय यंत्रणेकडून विविध टप्प्यांवर त्याला यशस्वी मंजुरात मिळवून त्याचे प्रारंभिक परिचालन करण्याची ऐतिहासिक संधी मा.संजय राठोड साहेब यांना मिळाली. गोर बणजारा समाजाची श्रध्दाभूमी असलेल्या पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या अथक प्रयत्नाने राज्य सरकारने पुढाकार घेतला विकास आराखडाही मंजूर केला आहे. खरोखरच त्यांच्या समवेत बणजारा सामाजाचे मी परमभाग्य समजतो. तसेच प्रकल्प साकारण्यात समस्त सृजनशील व सचोटीने काम करणारे कार्यतत्पर कार्यकर्ते, मंत्री, अधिकारी तथा सर्व निष्ठावान गोर समाजबांधव आहेत. ह्या प्रकल्प सिद्धीचे कार्य निःसंशयपणे प. पू. श्री बापूंच्या कृपेनेच आरंभीले गेले आहे व ते त्यांच्याच कृपेने द्रुतगतीने पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. अनंत जीवांच्या अचिंत्य कल्याणाची ती अनाकलनीय योजना आहे.
सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्राला एक नवीन सांस्कृतिक मानबिंदु लाभणार हे मात्र निश्चित अशी संस्कृती संर्वधनाची केंद्रे नितीमूल्यांच्या जपणूकी मध्ये मोलाचे योगदान देत असतात. म्हणूनच ते आमच्या विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, चिकित्सा, व्यवस्थापन इत्यादि क्षेत्रांमध्ये देशाला सन्मानाची व प्रगतीची नवीन ओळख देणाऱ्या संस्था व केंद्रांएवढेच महत्वाचे असतात. भोगवादाच्या महाकाय महीषासुरांना त्याग व निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून कसे थोपवायचे, त्यांच्यावर अंकुश कसा लावायचा, त्यांना वशीभूत कसे करायचे याचा संदेश अशी अध्यात्मिक स्थळे, अशी धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे अव्याहत देत असतात. मानवी जीवनात संतुलन आणण्यासाठी म्हणूनच ही धर्मस्थल तंत्रज्ञानस्थळां एवढीच मोलाची असतात. माहिती व ज्ञानप्राप्त असलेला मनुष्यप्राणी (Human Animal) मनुष्यत्व प्राप्तरत (Human Being) असणेही तेवढेच जरूरी आहे. रसेल या इंग्रजी तत्ववेत्याची उक्ती या संदर्भात अतिशय बोलकी आहे. ते अतिशय मार्मिकपणे सांगतात *"Knowledge without wisdom is like water in the sand"* देशभरातील बणजारा समाजाचे श्रद्धास्थान, उर्जास्थान, तथा "गोर बंजारा काशी" म्हणून ही सर्वतोपरी ज्ञात असलेल्या पोहरादेवी या श्रीक्षेत्राच्या शासनाच्या वतीने होणाऱ्या विविधांगी विकास आराखड्याच्या माध्यमातून बंजारा समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीसाठी मा. मंत्री ना. संजयभाऊ राठोड, महाराष्ट्रराज्य यांच्या संकलपनेतून साकारण्यात येणारा सेवाध्वज व "नंगारा" आकाराची इमारत एक प्रकारची ऐतिहासिक गोरसंस्कृती कोश म्हणून भविष्यात गोर बणजारांचे पर्यटनस्थळ ठरेल यात शंका नाही.
निसर्गपुजक बणजारा समाजाने हजारो वर्षापासून अमूल्य सांस्कृतिक वारसेला गोरधाटीने जन्म दिला. परंतू आजच्या आमच्या पूर्वजांचा संस्कारमुल्यांचा ठेवा असणारे अक्षर ग्रंथ असो वा सनातन संस्कृतीची साक्ष ठेवणारे परंपरागत अलंकार, वेषभूषा, सृजनाचा लेप असलेले जिवनोपयोगी व उत्सवउपयोगी साहित्य तथा सामुग्री संग्रहालयात बघायला मिळणार आहे. आज अनेकविध मंचावर मौखिक लोकसाहित्य, इतिहास, संस्कृती व बोलीभाषा साहित्यिकाच्या लेखणीतून जगमान्य ठरत आहे. याचाच परिणाम लक्षात घेताना "नंगारा" वास्तू मध्ये संग्रहालय व प्रदर्शनी, सभामंडप, भक्तनिवास, बगीचा असणार आहे. सौंदर्याने नटलेल्या वस्तुसंग्रहालयात गोर बणजारा समाजाच्या प्राचीन इतिहासाचे, व जीवनशैलीचे हुबेहूब दर्शन घडविण्याचा त्यायोगे प्रयत्न केला जात आहे. नंगारा ही केवळ वास्तुच नव्हेतर ऐतिहासिक गोरसंस्कृती कोश म्हणून भविष्यात नावारुपाला येणार आहे. हा ऐतिहासिक गोरसंस्कृती कोश, पोहरादेवी हे योग्य पायाभूत सुविधानीयुक्त असलेला हा सुनियोजित विकास आराखडा म्हणजे गोरबंजारा समाजाच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक ऐक्याचे लौकिक केंद्र होय व ते जगप्रसिध्द मानबिंदू आणि अमूल्य ठेवा ठरेल. नंगारा सादृष्य वास्तू ही निसर्गाशी समरूप असलेल्या व तांडयातील सामाजिक व सांस्कृतिक परिवेशातून तसेच मार्मिक संस्कारातून व्यक्त होणाऱ्या बणजारा समुदायाच्या मूलगामी व विज्ञानवादी विचार, सांस्कृतिक व सामाजिक समतेचे विकास दर्शक प्रतिक आहे. व्याकरणदृष्टया गोर बणजारांचा नंगारा हे वादय वीर रस प्रधान असून भविष्यात गोरमाटीची वीर वृती, साहस हे गतीमान ठेवण्यास प्रेरक ठरणार आहे. *‘’नंगारारे घोरेमं रिजो गोरमाटी"* संत सेवालाल यांनी सांगितलेल्या या एकमात्र ब्रिदवाक्यातून समस्त गोरबंजाराला यथायोग्य व प्रगत भविष्याकडे वाटचाल करण्याचा बहुमोल संदेश दिला गेलेला आहे. तांडाजीवनातील गोर बणजारांचे संघर्षवत जीवन, इतिहास, लोकसाहित्य, संस्कृती, संगीत व गेणागाठा यावरील तांडयाची मालकी नंगारा वास्तू ने पिढी न पिढी उजागर होत राहील. 
वर्तमान काळात गोर बणजारा समाज विविध वैचारिक व सांस्कृतिक संक्रमणातून मार्गक्रमण करीत आहे. निसर्गपुजक बणजारा समुदायाने हजारो वर्षापासून अमूल्य सांस्कृतिक वारसेला गोरधाटीने जन्म दिला. आज अनेकविध मंचावर मौखिक लोकसाहित्य, इतिहास, संस्कृती व बोलीभाषा साहित्यिकाच्या लेखणीतून जगमान्य ठरत आहे. त्यायोगे गोर बाणाजारांची सांस्कृतिक व सामाजिक बलस्थाने अधिक परिपक्व होण्याच्या हेतूने पोहरादेवी येथील सेवाध्वज व 'नंगारा’ सादृष्य आकाराची वास्तू ही समस्त गोर बणजाराला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.  नंगारामधुन बाहेर पडणाऱ्या लहरी हे बणजारा शब्द हूमाळो असा अर्थ येथे अपेक्षित आहे. (सकरात्मक वाटचाल)/ परिस्थितीजन्य बदल/अत:करणातील भावनिक लहरी त्यायोगे गोरबंजारांच्या सामाजिक, सास्कृतिक भाषिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकिय पटलावर गोर बणजाराला आश्वसकतेने ही वास्तू "नंगारा घोरावा" च्या माध्यमातून अग्रसित होण्यास सदैव प्रेरित करीत राहील. म्हणून 'हुंमाळो' गोरबोली वाचक शब्द नंगाराशी एकनिष्ठ होवून संस्कृती प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवाध्वज कार्यक्रम हा ऐतिहासिक ठरला आहे.
अशा या गोर बणजारा समाजाच्या महान संताचे पावन समाधी स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी सर्व गोर बणजारा समाज बांधवांची ईच्छा होती. आज १२ एकर जागेत ही ऐतिहासिक वास्तु उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सेवाध्वज ध्वजारोहण ही सर्व गोर बणजारा जमातीसाठी सुवर्णाक्षरात नोंदविणारी घटना आहे. या प्रकल्पाने महाराष्ट्राला एक नविन सांस्कृतिक मानबिंदू तर लाभेल त्याचबरोबर संस्कृती संवर्धनाच्या केंद्रातून गोर बणजारा याच्या नितीमूल्याच्या जपवणूकीचा प. पू. सेवालाल बापूचा पवित्र शुभ्र सेवाध्वज या वास्तूवर कायम व मानाने फडकत राहिल. ही ऐतिहासीक वास्तु म्हणजे प. पू. सेवालाल बापूच्या शिकवणीतील *'मार खुटा म रोपलीव"* या मौलिक विधानानुसार त्यांचे कार्य त्यानीच करून घेतले असले तरी त्यामागील खरे सुत्रधार मा. संजय राठोड साहेब मात्र समस्त बणजारा समाजासाठी प्रेरक- प्रेरणास्थान ठरले आहे. आराखडा ठरविताना जागेचे निरिक्षणणापासुन ते उद्भवणा-या अनुषंगीक अनंत अडीअडचणी, मंदीर परिसराचा स्थापत्याच्या अंगाने अभ्यास व निरिक्षण, अभिलेखाचे अध्ययन इत्यादी आवश्यक बाबींच्या अभ्यासपूर्ण हाताळणीतुन "पोहरादेवी वनपर्यटन विकास प्रकल्प" व "संत सेवालाल सागर संग्रहालय' व "नंगारा घराच्या" नियोजित वास्तूंचे आजचे वर्तमान स्वरूप साकारण्यामध्ये मा.संजय राठोड साहेब यांनी न भूतो न भविष्यति  असेसमस्त बणजारा बांधवांसाठी रचनात्मक कार्य  केले आहे. बंजारा समाजाचे श्रध्दास्थान व उर्जास्त्रोत असणाऱ्या संत सेवालाल महाराजांच्या या पावन भूमीत बांधण्यात येणारी 'नंगारा' आकाराची इमारत ही सर्व सोयी-सुविधांनी युक्त असेल. त्यासोबत विविध कामे पूर्ण झाल्यानंतर देशभरातून येथे येणाऱ्या भाविकांना परिपूर्ण व्यवस्था उपलब्ध होईल. द-या खोऱ्यात वास्तव्य करून उन, वारा, पावसाशी तादात्म्य साधून, निसर्गाच्या पंचतत्वांशी पूर्णतः सांगड घालून त्यांना आपल्या संघर्षरत जिवनाचा सांगाती करून निसर्गासी पूर्ण समरस झालेल्या "वनचरा' अर्थात बणजारा बांधवांचे जीवन दर्शन घडविणारे संग्रहालाय-स्मृतीस्थान व सेवाध्वज हा बंजारा समाजाचा सदा सर्वकाळी मानबिंदू राहणार आहे.
पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासामुळे गोर बणजारा समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक एकवाक्यतेला बळकटी येणार आहे. स्वत:ची प्राचीन संस्कृती, भाषा आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या गोर बणजारा समाजाचे सांस्कृतिक वारसा घट्ट होण्यासाठी हा विकास सहाय्यभूत ठरणार आहे. अशाच प्रकारे आपले न्याय, हक्क, प्रश्न,  मागण्या व अधिकारासाठी सामाजाने एकजूट राहणे  तितकीच काळाची गरज आहे. हे विसारता कामा नये. निःस्वार्थ सेवा व त्याग या भारतीय संस्कृतीच्या मुल्यांनी प्रेरीत हे नंगारा वास्तू व विराजमान सेवाध्वज निश्चितच बंजारा संस्कृती संवर्धनाचे जागतिक शोध पीठ ठरेल हे निश्चित. दि.12 फेब्रुवारी -2023 "एक दन समाजेसारू" अशी  मा. संजयभाऊ राठोड यांनी तमाम गोर बणजारा समाजाला दिलेल्या हाकेतुन या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या वातावरण निर्मिती आणि प्रचार, प्रसारासाठी मध्य प्रदेशातून एक रथ, आंध्र प्रदेशातून एक रथ, मुंबई मधून एक रथ आणि कर्नाटकातून एक रथ असे चार रथयात्रा सह लाखो बणजारा बांधवाच्या उपस्थितीमध्ये पोहरागड येथे होत असलेले पदार्पण. दि.1 2 फेब्रुवारी 2023 अनेक मान्यवरांची उपस्थितीत संत सेवालाल महाराज यांचा अश्वारुढ पंचधातुचा भव्य पुतळा अनावरण,135 फुट उंच सेवाध्वज स्थापना सह 593 कोटी रुपयांचा विविध विकास कामाचे भूमिपूजनायोगे भविष्यात *गोर बणजारा समाजाचा अधिकाधिक उत्कर्ष व्हावा आणि इतिहास-संस्कृती अधिकाधिक समृध्द व्हावी, या शुभेच्छांसह....* जय सेवालाल 🙏
   *- प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड*
      कोहळा तांडा ता. दारव्हा जि. यवतमाळ (महाराष्ट्र राज्य)
मो.- 9404372756
profdineshrathod@gmail.com

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...