ज्या समाजात आपण जन्माला आलो तो समाज विकासासाठी एकसंध बनला पाहिजे.
समाजातल्या समाजसेवकांचे जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही.
- वसंतरावजी नाईक मा. मुख्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य )
जीवन व्यक्तीचे असो की राष्ट्राचे असो त्यात संकटे ही येणारच . पण संकटकाळी आपण कसे वागतो आणि संकटाशी सामना कशा प्रकारे करतो यावरून व्यक्तीचे किंवा देशाचे मोठेपण ठरत असते. व्यक्तीचे मोठेपण स्वतःच्या कर्तृत्वावरून ठरते तर देशाचे मोठेपण देशातील सर्वांच्या कर्तृत्वावरुन , कामगिरीवरून ठरते. देशातील व्यक्तीचे हे कर्तृत्व जागविण्यासाठी आणि कार्याला विधायक वळण देण्यासाठी निरनिराळ्या स्तरांवर काम करणा-या सेवाभावी संस्थांची आवश्यकता असते . देशावर जेव्हा संकट येते तेव्हा या संस्थांकडून विशेष कार्याची अपेक्षा केली जाते. १९७१ मध्ये या देशावर पाकिस्तानने आक्रमण केले तेव्हा भरीव कार्याच्या दृष्टीने राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील भगिनींच्या संस्थांत सहकार्य निर्माण कारावे असे वाटले . आणि त्या दिशेने प्रयत्न केल्यावर आपल्याला दिसून आले की , अनेक महिला संस्थांनी पुढे येऊन कामांची मागणी केली. कमी वेळात जास्त काम करून दाखविले आणि तेही उत्तम प्रकारे त्यांना अजून पुष्कळ काम करण्याची इच्छा राहून गेली. अनेक लोकांना वाटले की , ' अजून चार दिवस युद्ध चालले असते तर अधिक कर्तृत्व दाखविता आले असते. हे खरोखर जिवंत राष्ट्राचे प्रतीक आहे. आपली सर्व शक्ती पणास लावून आलेल्या संकटावर मात करण्याची जिद्द ज्या समाजात किंवा राष्ट्रात असते तो समाज किंवा राष्ट्र कधीही पराभूत होत नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकटे आलीत तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने आत्मविश्वासाने आणि जिद्दीने संकटाशी मुकाबला केला. संकटांवर मात करून विजय मिळविला. कोयना येथे झालेल्या भूकंपामुळे १, ४०० गावांमध्ये ७० , ००० घरे पडली . ६०, ००० घरे नादरूस्त झाली . परंत महाराष्ट्राच्या आम जनतेने सर्व शक्ती एकवटून चार महिन्यांत ७० ००० हजार घरे बांधून दिली . महापूर येतात तेव्हा शेकडो गावांना जबरदस्त धक्का बसतो . हजारो घरे वाहून जातात. लाखो, करोडो रुपयांची संपत्ती नष्ट होते. त्यावेळी आपण पाहिले की , महाराष्ट्राच्या जनतेने त्या परिस्थितीशी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. १९६२ , १९६५ आणि १९७१ मध्ये जेव्हा या देशावर आक्रमणे झालीत तेव्हा महाराष्ट्राने सिंहाचा वाट उचलला. राष्ट्रीय संरक्षण निधीत कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्टाने अधिक निधी दिला. १९६५ मध्ये लालबहादूर शास्त्री मला म्हणाले की , ' लढाईकरिता आवश्यक असणाऱ्या या वस्तू आणण्याकरिता आपल्याजवळ परकीय चलन नाही. म्हणून तुम्ही सोने द्या तेही फुकट ! आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो की , सबंध देशातून जेवढे सोने जमले नाही त्यापेक्षा जास्त सोने महाराष्ट्राच्या जनतेने दिले ! संबंध देश एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला ! ज्यावेळी देशावर आक्रमण झाले तेव्हा अल्पबचत योजनेत जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचे धोरण शासनाने ठरविले. आणि ज्या महाराष्ट्रात दर वर्षी ३१ कोटी रुपये जमण्याची शक्यता असते तेथील जनतेने ६८ कोटी रुपये गुंतविले . महाराष्ट्रातील जनता कोणत्याही कामात किती अग्रेसर असते , किती मोठा हिस्सा उचलू शकते हे यावरून दिसून येते . मूलतःच महाराष्ट्रातील जनतेत देशभक्तेची भावना प्रखर आहे. परंतु या भावनाना वाव देणे आवश्यक असते. ते काम समाजातील निरनिराळ्या संस्था करतात . संकटकाळी विशेष रीतीने करतात. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये भगिनींच्या अशा अनेक संस्था आहेत की ज्या उत्तम कार्य करतात , अशा या संस्थांत परस्पर सहकार्य व एकसूत्रीपणा आणण्याचे कार्य तुमच्या समितीने केले ही आनंदाची गोष्ट आहे . संस्थेचे मोठेपण आणि संस्थेची उपयुक्तता संस्थेच्या निधी जमविण्याच्या क्षमतेवर अवलंबून नसते . तुमच्या संस्थेने पैसा कमी जमविला या भावनेने मी हे सांगतो आहे. असे नाही . तुमच्याकडे भरपूर पैसा आला , माझ्याकडेही आला , आणि तो केंद्रसरकारकडेही गेला . पण तुमच्याकडे जो पैसा आला त्यात गरिबांचा पैसा आला , सामान्यांचा पैसा आला. त्यांनी दिलेल्या एकेका पैशाची किंमत फार मोठी आहे . ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळाले त्यात काही असे आहेत की, ज्यांनी स्वतःजवळ एकही पैसा न ठेवता सर्व पैसे या निधीसाठी अर्पण केले. काही असे आहेत की, ज्यांनी उपाशी राहून जेवणाचे पैसे दिले . काहींनी स्वतःजवळचे सर्व पैसे तर दिलेच पण ते कमी वाटले म्हणून कर्ज काढून दिले . काहींनी अधिक वेळ कष्ट करून पैसे दिले . भिक्षेपोटी जमविलेले पैसे दिले . त्यांनी दिलेली ही देणगी अनमोल आहे. त्यांनी दिलेल्या राईएवढ्या निधीतून देशासाठी पर्वताएवढा त्याग करण्याची भावना व्यक्त झालेली आहे. देशावरील निष्ठा व्यक्त झालेली आहे. देशावरून स्वतःचे प्राण ओवाळून टाकणारे देशप्रेम व्यक्त झाले आहे. या समितीच्या रूपाने त्यांना आपली भावना व्यक्त करण्यास एक स्थान मिळाले. त्यांच्यात उसळणा-या देशप्रेमाच्या ऊर्मीना वाट करून देण्यास मार्ग मिळाला. किंचित प्रमाणात का होईना देशासाठी काही केल्याचे समाधान मिळाले. त्यामुळे गरिबांच्या , सर्वसामान्यांच्या मनात या संस्थेबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. या संस्थेच्या माध्यमांतून काही कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली . जनसामान्यांत ही जागृती निर्माण करण्याचे या संस्थेने केलेले कार्य लाखमोलाचे आहे असे मला वाटते . जेव्हा अनेक लहान माणसे एकत्र येऊन जिद्दीने काम करतात तेव्हा ती मोठ्या माणसापेक्षा मोठे काम करू शकतात. सामाजिक एकसंध भावनेचे हे प्रतिक आहे.ज्या समाजात आपण जन्माला आलो, तो एकसंध कसा बनेल याला प्राधान्य दिले तरच तो समाज प्रगतीच्या दिशेने अग्रभागी राहिल. आज महिला समितीने गरिबांकडून छोट्या छोट्या रकमा एकत्र करून दहा लाखांहून अधिक निधी जमविली आहे . युद्ध संपले आपले कार्य संपले असे नाही . खरे म्हणजे शांततेच्या काळातच देश बलवान बनविण्याचे कार्य आपणांस करावयाचे असते . येत्या काही वर्षांत हा देश आपण असा बलवान केला पाहिजे की , या देशाकडे वक्र दृष्टीने पाहण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही . खूप लढाऊ विमाने , रणगाडे , बाँब किंवा इतर युद्धसाहित्य निर्माण केल्याने देश बलवान बनत नाही . देशात खूप कारखाने काढले , धरणे बांधलीत , खूप अन्नधान्य पिकविले . गगनचुंबबी इमारती बांधल्या , विजेचा सर्वदूर लखलखाट केला तरीही देश बलवान बनत नाही. तर देशाचे बळ देशात राहणा-या लोकांच्या ज्ञानावर , त्यांच्या चारित्र्यावर व कर्तृत्वावर व देशासाठी सर्वस्व ओवाळून टाकण्याच्या वृत्तीवर अवलंबून असते . येणा-या नवीन पिढीत जेवढ्या अधिक प्रमाणात हे सदगुण असतात तेवढ्याच अधिक प्रमाणात देश बलवान बनत असतो. त्याचे सामर्थ्य हे त्याची समृद्धी वाढत असते आणि नवीन पिढी घडविण्याचे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य वयाच मोठ्या अंशाने महिलांवर अवलंबून आहे. जिजाबाईने ज्याप्रमाणे महाराष्ट्राला आणि या देशाला ललामभूत ठरणा - या सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजींना घडविले त्याप्रमाणे प्रत्येक महिलेने कर्तृत्ववान व देशभक्ती पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य केले पाहिजे. मी आपणांस सांगू इच्छितो की, घरातील माणूस शिकतो तेव्हा घरात तो एकटाच शिकलेला असतो. पण घरातील स्त्री शिकलेली असते तेव्हा सारे घर शिकते , संस्कारक्षम बनते . त्यासाठी महिलांनी शिकले पाहिजे , मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे. इतर वाचनाने ज्ञान वाढविले पाहिजे . स्त्रीशिक्षणाचा सर्वत्र वेगाने प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आज विद्यार्थी शिक्षण घेऊन तयार झाला की, त्याला श्रम करण्याची लाज वाटते. शेतीत काम करणे कमीपणाचे वाटते. ही भावना बदलवून श्रमाबद्दल प्रेम, श्रमिकाबद्दल आपुलकी नवीन पिढीत निर्माण झाला पाहिजे. त्याला आपल्या शेजा - याबद्दल , समाजाबद्दल , समाजात जे मागासलेले असतील त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटली पाहिजे. स्वतःचे व देशाचे आपण शिल्पकार आहोत ही भावना त्यांच्यात रुजविली पाहिजे. त्यांच्यात विधायक कार्याबद्दल आस्था निर्माण केली पाहिजे . युद्ध संपले म्हणून आपण गाफील राहिलो तर ते योग्य होणार नाही . आता कदाचित काही वस्तुंची टंचाई निर्माण होईल . युद्धामुळे आपल्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त ताण पडला त्याचीही झळ कदाचित काही दिवस आपल्याला लागेल. कारण युद्धाची खरी झळ युद्ध संपल्यावरच लागत असते. तेव्हा युद्ध जिंकल्याचा आनंद मानतानाच युद्धानंतर निर्माण होणा-या परिस्थितीला तोंड देण्याकरिता आपण तयार राहिले पाहिजे . यापुढेही वस्तूंचा संग्रह करणे, अन्न व इतर वस्तूंची उधळपट्टी करणे या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. या संस्थेचे काम अजून संपलेले नाही. स्त्री - संस्थांना समाजसेवेची गोडी लावणे, त्यांना नवीन नवीन कामे करण्यास प्रोत्साहित करणे, आणि त्यांच्यात समाजसेवेसाठी आवश्यक गुणांची वृद्धी करणे आवश्यक आहे. समाजातल्या समाजसेवकांचे जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही. समाजात काटकसरीची व बचत करण्याची वृत्ती निर्माण करण्याचे काम महिलाच उत्कृष्ट रीतीने करू शकतात. समाजातील उच्चनीचतेची भावना त्या नष्ट करू शकतात आणि समाज एकसंध बनवू शकतात. अशा प्रकारे किती तरी कार्य करावयाचे आहे. देश आणि भारतीय समाज बलवान करावयाचा तर धर्म , वंश , पंथ , जात , भाषा यांवर आधारलेले भेद नष्ट झाले पाहिजेत. आम्ही अस्पृश्यता , उच्चनीचता पाळतो. त्यामुळे समाजात एकात्मता निर्माण होत नाही. समाजातून ही भेदभावाची भावना नष्ट करण्यासाठी स्त्रीया मोलाचे कार्य करू शकतात . कारण पूर्वी छताछुतीची , जाती , धर्मभेदांची भावना स्त्रियांतच अधिक प्रमाणात होती. आजही जुन्या विचारांच्या स्त्रिय समाजात जास्त आहेत. त्यांच्या विचारात आणि आचारात मूलभूत फरक घडवून आणून समाजातून सर्व प्रकारेच भेद नष्ट करून समाज एकजिनसी बनविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रियांनी व महिला संस्थांनी केले पाहिजे. स्त्रीया छोट्या मनाच्या असतात असे अनेकांचे मत आहे . त्या मताशी मी सहमत नाही. त्या जाणीवपूर्वक काम करतात तेव्हा विकाराला विसरून विचाराने काम करतात. खेळीमेळीने काम करतात असा माझा अनुभव आहे . ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या जागेपासून तो देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत सर्व जागा भूषविण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे यात आता शंका राहिली नाही. जगाला विस्मित करून टाकणारे आजचे भारताचे कर्तृत्व एका स्त्रीच्याच नेतृत्वाखाली एकवटले आहे . दीर्घकाळ स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरात, चार भिंतींच्या आत मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे . पावसामुळे ज्याप्रमाणे रोपांना अंकुर फुटतो , त्याचप्रमाणे संकटामुळे माणसाच्या कर्तृत्वालाही नवीन पालवी फुटते. याही संस्थेने संकटकाळात समाजाच्या कर्तृत्वाला चालना दिली आहे. आता त्यांना कर्तृत्वाच्या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर करावयाचे आहे. आत्मविश्वासान कार्य केल्यास ते कठीण नाही. ते महत्तम कार्य ही संस्था करील व समाजात व एक नवीन आदर्श निर्माण करील अशी मला आशा आहे .
संदर्भः वसंतराव नाईक यांची निवडक भाषने
( २१ डिसेंबर १९७४ या रोजी महिला समिती , मुंबईत दिलेले भाषन)
संकलनः दिनेश सेवा राठोड
profdineshrathod.blogspot.com
******************************************
The society in which we were born, should united and integrated
There will be no mobility in the society, unless the network of social workers is created everywhere.
-Vasantraoji Naik (Former Chief Mnister,Maharashtra State)
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.