Saturday, April 2, 2022

भिमणीपुत्र

🍀 गोर भाषाशास्त्र आणि साहित्याचा सामर्थ्यवान मेरूमणी भीमणीपुत्र 🍀
****************************************
✍️( c.): डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट. 
मो.नं. : 9420315409., 8411919665.
****************************************
              गोरबंजारा समाजात अनेक दिग्गज विर लढवय्ये, महान तपस्वी, त्यागी युग पुरूष, व्यापारी, लदेणीकार मैलो गणतीचा प्रवास करीत जन्मास आले नी नियत कालमानानुसार निजधामास गेले. त्या महान योध्यांच्या राहिल्या फक्त आठवणी. परंतू हयात असणा-यांच्याही आठवणीत रममाण होणे यथायोग्य गरजेचे वाटते. असेच गोर विचार,संस्कृती , चालीरिती, उत्सव, वाद्य, संगीत भाषा इत्यादी बाबीचे निष्णात निपुण जाणकार तुम्हा आम्हा मध्ये तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकत आहेत. असे गोर भाषाशास्त्रज्ञ ,हाडाचे साहित्यिक भीमणीपुत्र हे होत. आज 02 एप्रिल त्यांच्या अभीष्टचिंतनाचा दिवस, त्या निमित्ताने केलेला लेखन प्रपंच. 
            वास्तविक पहाता गोरबंजारा समाजाच्या लिखित साहित्याला बहर सत्तरीच्या नंतर आलेली असल्याचे अभ्यासाअंती दिसून येते. त्या पूर्वी 1935 साली गोर बंजारा समाजाचे आद्य समाज सुधारक स्व. बळीराम हिरामण पाटील,मांडवीकर,ता.किनवट, यांनी " गोर बंजारा लोकांचा इतिहास " हा दुर्मिळ संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केला. मूलतः हा ग्रंथच अनेक गोर बंजारा लेखकांच्या साहित्य विश्वाची नांदी ठरला. या मांडव्य रूषीच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या भूमीत, बळीराम पाटलांच्या साहित्य विश्वाच्या कुशित एक प्रतिभावंत साहित्यिक,लेखक जन्माला आला. त्यांचे नाव भीमणीपुत्र मोहन गणूजी नाईक,चिचखेला तांड्याचे नायक ,वडिल गणूजी नाईक व आई भीमणीबाई नाईक , यांच्या पोटी मराठवाड्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या चिंचखेड तांडा ता.किनवट,जि.नांदेड येथे त्यांचा जन्म दि. 02 एप्रिल 1950 रोजी झाला.
               वास्तविक पाहता त्यांच्या घराण्यांच्या कौटुंबिक परंपरेचा विस्तार फार मोठा आहे. गणूजी नाईकांचे सर्वात मोठे बंधु वसराम नाईक,त्यांच्या पाठचे गोमाजी नाईक , तिसऱ्या नंबरचे गणूजी नाईक व सर्वात लहान मनिराम नाईक अशा चार भावंडांचा एकत्रित संयुक्त परिवार होता. घरात बारा सालगडी, 300 एकर शेती, एक छकडा, पडदयाची डमनी गाडी, अंगणात भला मोठा उंचच्या उंच काठेवाडी घोडा, कौटुंबिक संरक्षणासाठी शासनाने दिलेली रायफल, संपूर्ण परिवार निर्वेसनी व श्रमजीवी होता. या संपूर्ण विस्तारीत कुटूंबाचे संचालन (कारभारपण)    गोमाजी नाईक हे करायचे.
             तत्कालीन परिस्थितीत संपूर्ण चिंचखेड परिसरात गोमाजी नाईकांचा फार मोठा दरारा आणि रूबाब होता. ते कमालीचे शिस्तबद्ध व न्यायप्रविष्ट होते. गावा, तांड्यावर त्यांची वैचारिक पक्कड जबरदस्त होती. आजही या घराण्याची शिस्त आणि न्यायप्रियता वाखणण्या जोगी आहे. तो वारसा मोहनरावाचे धाखटे बंधु श्री. बंडूसिंग गोमाजी नाईक (माजी जि.प.सदस्य, नांदेड) हे चालवितात. न्याय, निवाडा आजही अखंडितपणे चालूच असतो. संपूर्ण तांडा नी गाव व्यसन व तंटामुक्त आहे. आजही संपूर्ण गावात दारूबंदी आहे. याचे पूर्ण श्रेय नाईक घराण्याला जाते. अशा कुटूंब वत्सल घराण्यात भीमणीपुत्र मोहनरावांची जडण घडण झाली. 
            मोहनराव बालपणापासूनच तल्लख व चळवळ्या बुध्दीचा बालक होता. म्हणून मोठे बाबा गोमाजी नाईक त्यांना नेहमी सोबत घेऊन फिरायचे. या सर्व श्रमसंस्काराची छाप या बालकावर पडू लागली. सुरूवातीचे प्राथमिक शिक्षण तांड्यातील शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मांडवी येथे व महाविद्यालयीन शिक्षण पुसद येथिल फूलसिंग नाईक महाविद्यालयात झाले. 
             त्यांना मुळातच अलौकिक कुशाग्रबुद्धिमत्ता लाभलेली असल्या कारणाने, हरहून्नरी  स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. सरकारी नोकरीच्या अनेक संधी घरबसल्या दारापर्यंत आल्या त्या सर्व त्यांनी धुडकाऊन लावल्या. पोलीस विभागात फौजदार पदाचा काॅल आला , शिक्षक ,प्राध्यापकाची संधी घर बसल्या आली, या सर्व सरकारी नोकऱ्यांना त्यांनी दुर लोटले. वडिलांचे लाडके, आई भीमणीबाईचे अपार प्रेम, बारा औताची शेती, अनेक नोकर चाकर, गायी गुरे, रोज मजूरदारांचा राबता घरात होता. पंचक्रोशीत वडिल गणूजी नायकांचा आणि गोमाजी नायकांचा मोठा दरारा होता. जन्मताच श्रीमंतीचे वैभव त्यांना लाभले होते. अशा वैभवशाली घराण्यांची परंपरा मोहन तूला चालवायची आहे. तूला नौकरीची काय आवश्यकता ? असे मोठे वडिल गोमाजी नाईकांचे म्हणने म्हणजे आदेशच होते. 
                आई वडिलांची शिकवण ,नाईक घराण्यांची परंपरा शिरोधार्य मानून मोहनराव शेती कामाला लागले. अर्धांगिणी शेवंताबाई नाईक घराण्यांची कुलवधु म्हणून त्यांना लाभली, ती आज तागायत अखंडित आहे. या घराण्याच्या संसार, व्यवहारामध्ये शेवंताबाईचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. त्यांच्या संसार वेलीला दोन  कन्यारत्न व दोन पुत्ररत्न फुला फळाला आली. थोरली मुलगी सौ. आराधनाताई तुळशीराम चव्हाण , जावई बापू उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे शिक्षक आहेत. दुसरे जावई साहेब कोल्हापूर येथे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मुलगी प्रा.सौ. भारतीताई अनिल मुडे ,ही सुध्दा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. थोरले चिरंजीव ॲड.चेतन नाईक माहूर येथे वकीली व्यवसाय करतात व धाकटा कृषी पदवीचे शिक्षण घेऊन स्वतः वडिला बरोबर शेती कामाला लागला. आज सर्व नातवंड लथपथ त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतांना, बागडतांना दिसतात. 
              मोहनरावांनी स्वतःला शेतीत ,मातीत गुंतून घेतले. पिक पाण्या सोबत त्यांनी आपले नाते जोडले. शेतात अंकुरलेली पिके, फळा फुलांनी लगडलेली पराटी, तुराटी रानातील रानगंध या सर्वांच्या रूणानुबंधात ते घट्ट बांधल्या गेले. या रानगंधातून शेतीच्या बांधातून गोर बंजारा समाजाचा सामर्थ्यावान शिलेदार ,मेरूमणी भाषाशास्त्रज्ञ उदयास आला त्यांचे नाव भीमणीपुत्र. 
              जन्मदात्रीचे नाव भीमणीबाई असल्या कारणाने आपल्या साहित्यिक लेखणीला त्यांनी भीमणीपुत्र हे नाव दिले. माझ्या लेखणी सोबत जन्मदात्रीचे नाव अखंडित राहावे हा त्यांचा उदात्त हेतु. 
              भीमणीपुत्राच्या लेखणीला बहर आली ती मांडवीच्या घराण्याने ,कारण मांडवी घराण्याशी साहित्यिक नाळ विद्यार्थी दशेपासूनच जोडल्या गेली होती. नंतरच्या काळात ती चांगली बहरली. त्या वेळेस त्यांना स्व. बळीरामजी पाटील यांचा सहवास लाभला. पाटील यांचे जेष्ठ पुत्र स्व. खासदार उत्तमरावजी राठोड व बंधुपुत्र स्व. मधुकरराव पाटील यांच्या कडून वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली . त्या वेळेस मांडवीला " हिरा वाचनालय " ही एकमेव ग्रंथालय होती . काही दुर्मिळ पुस्तके ,ग्रंथ आणण्यासाठी ते मांडवीला जात असत. एकंदरित या अनमोल सहवासातून त्यांना वाचन लेखनाची प्रचंड आवड निर्माण झाली. 
               शेतीच्या बांधावर अर्धांगिणी शेवंताबाईच्या सहवासातून शब्दशिल्प लेखणीच्या माध्यमातून उमटत गेले नी साहित्य शिवार फुलत गेले. ती लेखणी आज तागायत एकात्तरी ओलांडून बहात्तरी सुरू झाली तरी अखंडित पणे वाहत्या धारेप्रमाणे नितळ ,निश्चल, निरामय चालू आहे. आजही तरूणांना लाजवेल अशी चपळायी व तेजःपुंज ,पाहता क्षणी नजरेत भरणारं असं मुखमंडल आहे. 
               त्यांचे घराणे मुळातच पुरोगामी विचाराचे, परिवर्तनवादी चळवळीचे मुख्य केंद्र होते. निजाम राजवटीशी दोन हात करणारे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या खंजेरीशी नाळ जोडणारे होते. या सर्व विचार सरणीणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. यातूनच वेग वेगळ्या साहित्य लेखनाची सुरूवात झाली. 
                त्यांनी " गोरमाटी संस्कृती आणि संकेत " हे पहिले पुस्तक जन्मास घातले .त्यानंतर अनेक पुस्तके त्यांनी लिहिली त्यामध्ये दमाळ, तुकारी, क्रांतीसिंह तोडावाळो, मारोणी, केसूला, लावंण ,नसाबी, कडापो, गोरपान ईत्यादी अनेक वैचारिक पुस्तके साहित्याच्या रूपातून प्रकाशित झालेली आहेत . त्यांच्या साहित्य लेखनामध्ये साहित्याचे सर्वच प्रकार आढळतात. गोर कथा ,कविता, रितीकाव्य, गीतकाव्य, लडीगीत, मुक्तछंद काव्य, गोर केणावट, साक्तर ( गोर संस्कृतितील पुरातन गोष्टी) असे साहित्याचे अनेक प्रकार त्यांनी जोपासले. विद्रोही, संघर्षशील साहित्याची त्यांनी निर्मिती केली. 
             गोरबंजारा लोक साहित्यकार, भाषाशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. तांडा संस्कृतीचे जीणे आणि जगणे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडले. आपल्या प्रतिभाशाली लेखनाने अनेक गोर बंजारा लेखक, विद्वान, नव तरूण यांच्यावर छाप पाडली. त्यांच्या लेखन साहित्याचा आधार, संदर्भ घेऊन अनेक विद्वान पीएच. डी., एम. फिल. झाले. त्यांनी गोरबंजारा समाजावर चौरंगी लेखन करून साहित्य सामग्री, ग्रंथ, पुस्तके संशोधक, विद्वाना करीता स्वतःचे साहित्य उपलब्ध करून दिले. 
              बंजारा समाज मुळातच उत्सव प्रिय समाज आहे. राना वनात, तांडा संस्कृतीमध्ये राहून या समाजाने आपली संस्कृती, चाली रिती, तिज उत्सव, दसरा, दिवाळी, होळी, लेंगी गीत, लग्नगीते, ढावलो, साज ,श्रृंगार जोपासली आहे. या सर्व संस्कृती कला प्रकाराचे अवलोकन लेखकाने अतिशय जीव ओतून केले आहे. 
              त्यांचे" गोरपान " नावाचे पुस्तक प्रा.डाॅ. दिनेश सेवा राठोड यांनी इंग्रजी मध्ये रूपांतर करून साता समुद्रा पलिकडे पोहोचविले. या पुस्तकाला ख्यातकीर्त असा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. युरोप  मध्ये रोमा जिप्सी बंजारा समाजात हा ग्रंथ मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला.देशातील वेग वेगळ्या सात भाषेत हे पुस्तक रूपांतरित होऊन प्रकाशित झाले आहे. आज घडीला दहा हजाराच्या वर याच्या प्रती विकल्या गेलेल्या आहेत. गोर संस्कृती ,साहित्याला श्रृंगार रसाच्या माध्यमातून सजविण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. 
              बंजारा समाजातील पुरातन दुर्मिळ शब्द, संस्कृती, कला प्रकाराचे एक वेगळे सदर त्यांनी साहित्य रूपात " अनवाल "  आणि "वाते मुंगा मोलारी (MY SWAN SONGS) " या नावाखाली चालवित आहेत. वाते मुंगा मोलारी भाग एक हे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहे.या ग्रंथाच्या संपादनाचे कार्य डाॅ. रवींद्र राठोड नागपूर, यांनी केले आहे. यामध्ये अश्मयुग, लोहयुग, ताम्रयुग अशा अनेक युगाचा अभ्यास करून, आपले लेखन कार्य हडप्पा ,मोहेनजोंदाडो, सिंधुघाटीची सभ्यता या पुरातन संस्कृती पर्यंत आणून सोडले आहे. या भाषाशास्त्रज्ञाने आपली साहित्य संपदा समाजापुढे आणण्याचा भीष्म प्रयत्न आणि साहस केला आहे. 
              त्यांच्या साहित्य चळवळीची एक शोकांतिका वजा कळवळा आहे की माझा समाज शिकला पाहिजे, वाचला पाहिजे, सुधरला पाहिजे, निर्वेसनी झाला पाहिजे. असा आर्त टाहो त्यांनी फोडला आहे. त्यांच्या विषयी एक गोष्ट मला आठवते, ही गोष्ट 2007 ची आहे. आमच्या कॉलेजच्या स्नेह संमेलना करीता आपण प्रमुख अतिथि म्हणून यावेत याचे निमंत्रण देण्या करीता मी आणि माझे मित्र बी. के. राठोड दोघे गेलो. आधीची काही विद्वान मंडळी बसलेली होती. त्यांनी आम्हा दोघांचे सहर्षवदनाने स्वागत केले. त्या प्रसंगी त्यांनी एक व्यथा आमच्यापुढे प्रकट केली, " लोक वाचनच करीत नाहीत, ही माझी सर्व पुस्तके ,साहित्याची तिजोरी, मी मेल्यावर माझ्या सरणावर रचून ठेवा व दया आग लाऊन. " येवढ्या महान लेखकाचे हे बोल ऐकून मी अर्धमेला झालो. आज आमची तरूण मंडळी वाचना पेक्षा नाचण्यात दंग आहे. त्यांची कपाटे ,आलमा-या विविध प्रकारची कापडं, चप्पल बुटांनी व ईतर वस्तूंनी खचाखच भरलेली आहेत. परंतू त्यामध्ये कुठे पुस्तकाला स्थान दिसत नाही. ही बाब समाज हिताच्या दृष्टिकोनातून हितावह वाटते व तमाम सर्व गोर बांधवांना विचार करावयास लावणारी आहे. 
             गोर बंजारा समाजाच्या परिषदा व चळवळी त्यांनी साहित्य रूपाने गाजविल्या. भारतातील पहिले गोरबंजारा परिवर्तनवादी साहित्य संमेलन उमरखेड , जि.यवतमाळ ,येथे दि.11 जानेवारी 2003 साली त्यांचे व्याही देवीदास मुडे गुरूजी उमरखेडकर यांनी भरविले. या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा भीमणीपुत्र यांनी सांभाळली. त्याही वेळेस आपल्या अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणाने जन समुदायास भूरळ घातली.  याच वेळेस " याडी " नावाचे आत्मकथन श्री. पंजाब चव्हाण पुसद, यांचे प्रकाशित केले. एका नवोदित लेखकाला उदयास आणले, त्यांना नाव लौकिक मिळवून दिले  याचे संपूर्ण श्रेय भीमणीपुत्रांना जाते .
              त्याचबरोबर या गोर भाषाशास्त्रज्ञाने साहित्य विश्वात आपले सोनेरी नाव गिरवत दि. 29 व 30 मार्च 2018 च्या डोंबिवली मुंबई, येथील साहित्य संमेलनात अमोघ ज्ञानशक्तिच्या सामर्थ्याने जनमानसावर , रसिक श्रोत्यांवर आपली छाप पाडली. तांडायातलं जगणं,वागणं ,बोलणं ,रित रिवाज, भाषा, संस्कृती, नृत्य, संगीत,पुरातन गुज गोष्टी , दुःख, दैन्य, कडापो या सर्व बाबतीचा  बारकाईने साहित्यात्मक अभ्यास करून त्याची शास्त्रशुध्द मांडणी त्यांनी केली. म्हणून ते गोरबंजारा भाषाशास्त्राचे महापंडित म्हणून लौकिकास पात्र ठरतात. 
              चिंचखेड तांड्यातील जगण्या वागण्याच्या रूढी, परंपरेलाच त्यांनी विद्यापीठ मानलं . ते नेहमी अभिमानाने सांगतात, " My Chinchkhela Tanda Is My Folklore University. " माय मातीची सेवा करत जीवनाची सायंकाळ गाठली. आपल्या तांड्याला गोर साहित्य, संस्कृतीचे विद्यापीठ म्हणून गौरव मिळवून दिले . म्हणून म्हणावेसे वाटते , " Bhamaniputra is a lion of the Gorbanjara literature " खऱ्याअर्थाने ते गोर साहित्य शास्त्राचे अधिनायक ठरतात किंबहुना ते आहेतच. 
              समाजातील कित्येक ज्ञानशाखांच्या संमेलनाचे  अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. किनवट, मांडवी, यवतमाळ, उमरखेड, औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा ठिकाणी गोर साहित्याचा ठसा उमटविला. आजही जीवनाच्या सायंकाळी लेखन कार्य अखंडितपणे चालू आहे. खंगून गेलेल्या शरीराच्या कित्येक शस्त्रक्रिया झाल्या. त्यांचे जानेवारी 2020 ला  हरण्याचे फार मोठे ऑपरेशन नागपूर येथे झाले. त्या निमित्ताने त्यांना भेटावयास चिंचखेड येथे गेलो. त्याही वेळेस हा भाषाशास्त्रचा भिष्माचार्य  विस टाक्याचे भले मोठे ऑपरेशन होऊन सुध्दा आपल्या भाषाशास्त्राच्या अखंडित लेखन कार्याला लागले होते. याही आधी त्यांच्या वेग वेगळ्या सात शस्त्रक्रिया झाल्या. वय मावळतीकडे झुकलेले असतांना सुध्दा थरथरल्या हातात तिन फनाच्या काठीचा आधार, कानाला सदोदित कर्णयंत्र त्याशिवाय ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय काम  करीत नाहीत. चिंतनशील  स्वभाव त्यांना स्वस्थ व शांत बसू देत नाही. अहोरात्र गोरबंजारा साहित्याची व मायबोली भाषेची भक्ती आणि ध्यास या महान साहित्यिकांने जोपासले. मोठ्या प्रमाणावर गोर भाषाशास्त्राची श्रम साधना या साहित्य  सुपुत्रांने केली आहे. 
              गोरबोली भाषेची आणि भाषाशास्त्राची सेवा त्यांनी अखंडितपणे चालविली. जन्मदात्री आई बरोबरच गोरबोली भाषेला आई मानले. माझ्या गोरबोली भाषेला घटनात्मक राजभाषेचा दर्जा मिळावा,  विद्यापीठाच्या ज्ञानकक्षेत स्वतंत्र भाषा संकुल स्थापन व्हावे, याकरीता नामदार मंत्री महोदय संजयभाऊ राठोड यांच्या करवी शासनाकडे पाठपुरावा केला. अनेक ठराव व पत्रोच्चार शासन दरबारी करून भाषेला घटनात्मक दर्जा मिळवून देण्यास आग्रही भूमिका त्यांची राहिली. 
              त्यांच्या लेखन कार्याविषयी अनेक लेखक, समीक्षक, कवि यांनी मुक्तकंठाने कवने केली व गायीली आहेत. साहित्य शिवारातील विचाराचा वारसा चालविणाऱ्यांना त्यांनी कन्या, पुत्र मानले. खांदेशाची वाघीण म्हणून जिची ओळख आहे अशा जिजाताई राठोड चाळीसगाव ,यांना विचारपुत्री मानले. गोर गायिका शाहिन शेख पुसद, हिला मानसकन्या व विदर्भातील ख्यातनाम कवि उभरता शुक्रतारा कवि सुरेश राठोड काटोल  नागपूर आणि डाॅ. रविंद्र राठोड नागपूर यांना विचारपुत्र मानले. कवि सुरेश राठोड यांनी आपल्या वेग वेगळ्या ग्रामीण व शेती बांधावरील कविता नावारूपास आणल्या आहेत. त्यांनी एक स्वतंत्र कविता संग्रह आदरणीय भीमणीपुत्र काकाजींच्या जीवन कार्यास चरित्रात्मक रूपाने " गेय संवाद "  या नावाने समर्पित केले आहे. 
              या गोर भाषाशास्त्रज्ञ शिलेदाराचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यांच्यावर सदैव आर्द्र स्नेह करणारी मंडळी एकत्र येऊन त्यांच्या स्तुतीपर कवित्व करून " जग मोतीया " नावाचे कविता संग्रह प्रकाशित केले. या संपूर्ण कवितांचे संपादन विदर्भ सुरमणी कविवर्य सुरेश राठोड यांनी केले आहे. 
              काकाजींच्या साहित्याचा वारसा सदोदित बहरत रहावा, चालत रहावा म्हणून त्यांच्या संपूर्ण साहित्य विश्वाचा खजिना त्यांनी चिरंजीव ॲड. चेतन राठोड व बंधुपुत्र अमोल राठोड यांच्या हाती सुपूर्द केले आहे. आज अमोल वेग वेगळ्या कविता, वैचारिक लेख वाचका पुढे आणून साहित्य विश्वात आपले पाय रोवत आहे. 
              या जाज्वल्यमान, विद्रोही ,प्रतिभासंपन्न लेखकांच्या समवेत 2017 साली त्यांच्या हस्ते माझा नवोदित लेखक म्हणून गौरव करण्यात आला. सारखाणी ता. किनवट येथे अखिल भारतीय लेंगी महोत्सवाचे आयोजन सारखाणी येथील धडाडीचे नेते श्री. विशाल जाधव यांनी केले होते. तेथे भीमणीपुत्र काकाजी मुख्य सत्कारमूर्ती व अतिथि म्हणून उपस्थित होते. त्या प्रसंगी माझ्या विषयी काढलेले उदगार," वसंत भाऊराव राठोड, हा नवोदित लेखक झुंजार लेखणी हाती घेऊन उभा आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. " त्यांच्या मुखवदनातून निघालेले गौरवोदगार आजही कित्येक पटीने शाबासकीची थाप देत असतात. 
              ऐतिहासिक क्रांती दिवस दि. 09/08/2020 , रविवार रोजी आदरणीय काकाजी भीमणीपुत्र  यांची दोन पुस्तके, " लावण पिवसी " व ॲड. चेतन नाईक संपादित " वाते मुंगा  मोलारी " भाग दोन  तसेच कवि सुरेश मंगुजी राठोड लिखित " गेय संवाद " या तिनही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मज पामराच्या शुभहस्ते झाला .आज याचा मला सार्थ अभिमान होतो आहे. काकाजींनी व सन्मानीय आयोजकांनी  ही अवजड धुरा माझ्या हाती सोपविली होती. त्यांनी मला त्या योग्यतेचं मानलं ,या दाखविलेल्या मनाच्या थोरपणा बद्दल मी सतशः त्यांच्या रूणानुबंधात राहिन. आदरणीय ,काकाजी भीमणीपुत्र यांची लेखणी दिवसेंदिवस बहरत राहो , त्यांना दीर्घकालीन आयुरारोग्य लाभो ही मनस्वी सदिच्छा व्यक्त करतो व आज त्यांच्या जन्म दिना प्रीत्यर्थ सहृदय अभीष्टचिंतन करतो नी थांबतो 🌹👏 !
*****************************************
शब्दांकन : डॉ. वसंत भा.राठोड,मांडवी किनवट.
मो.नं. : 9420315409, 8411919665.
Mail ID: rathodvasant863@gmail.com 
*****************************************

No comments:

Post a Comment

Jada jankari ke liye comment kare.

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...