जागतिक गोर बंजारा दिन
8 एप्रिल हा दिवस विश्व बंजारा दिन म्हणून साजरा केला जातो. बंजारा दिन साजरा करण्याची परंपरा अगदी अलीकडील असली तर बंजारा जमातीला अत्यंतिक प्राचीन इतिहास आहे.
राजस्थान मूळ भूमी असलेला बंजारा लभाना समाज भारतभर विखुरलेला आहे.राजस्थान ,पंजाब ,उत्तर प्रदेश ,कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,तेलंगना ,महाराष्ट्र राज्यात यांची संख्या लक्षणीय आहे.
बंजारा समाजाचे मूळ हरपळी नगरी म्हणजेच हडप्पा मोहन्जोदरो संस्कृती पर्यंत जातो.बंजारा पारंपारिक भजनात नारी हरपळी किंवा मारी हरपळी याडी असा उल्लेख येतो.हा समाज मुळचा पशुपालक समाज.राजस्थान हे या समाजाचे मूळ वास्तव्य.बंजारा हा शब्द वाणिज्यिक म्हणजे व्यापार संबंधित आहे.बैलाच्या पाठीवर धान्य टाकून ,ते धान्य देशाच्या कानाकोप-यात वाहून नेण्याचे काम बंजारा लोक करत असत.राजस्थानमध्ये अरवली पर्वतराजीत लुनी नावाची नदी आहे.या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी सुरूवातीचे काही अंतर गोड्या पाणी वाहून नेते व पुढे मग तिला आपोआप खारटपणा प्राप्त होतो.समुद्रसान्निध्य नसताना केवळ जमीनीच्या गुणधर्मावर खारट पाणी असलेली ही एकमेव नदी.कच्छच्या रणात लोप पावण्यापूर्वी या नदीच्या काठी अनेक ठिकाणी नैसर्गिक मीठाचे साठे आहेत.पुरातन वाड़्गमयात लवणगिरी पर्वत असा जो उल्लेख येतो ,तो पर्वत म्हणजे लुनी नदीभोवतालच्या डोंगररांगा.हजारो वर्षापूर्वी या नदीकाठच्या लोकांचा व्यवसाय मीठाशी संबंधित होता.मिठालाच लवण असं म्हणतात.म्हणून ज्या लोकांनी मीठाचा व्यापार केला ती लोकं पुढं लवाणी /लंबाणी मग पुढे लमाणी या नावाने ओळखली जाऊ लागली.काळपरत्वे व उच्चारपरत्वे शब्दांचे अपभ्रंश होत गेले व बंजारा समाज वेगवेगळ्या सत्तावीस नावांनी ओळखला जाऊ लागला.बंजारा ,बंजडा,बनजारा,बनजारे,बंजारी ,शिंगाडे(महिला वेशभुषेत शिंग लावतात म्हणून) ,बालदिया,लमाण,लंबाडा,लम्बाडे,लबाना,लभान,लभानी,लधेनीया ,गोर अशा अनेक नावाने बंजारांची ओळख आहे.राठोड ,पवार ,चव्हाण ,आडे,जाधव ही त्यांची मूळ कुलनामे.कुलनामातही प्रांतपरत्वे थोडाफार बदल झाला आहे.बंजारा समाजात काही पोटप्रकारही आढळून येतात.गोरबंजारा ,चारण बंजारा ,भाटबंजारा ,सनार बंजारा ,मथुरा बःजारा ,ढालिया बंजारा ,जोगी बंजारा ,ब्रिजवासी बंजारा.हे सर्व पोटप्रकार व्यवसायावरून पडलेले आहेत.
महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या यवतमाळ व बीड जिल्ह्यात भरपूर आहे.बंजारा समाजात पोटप्रकार असले तरी त्यांची बोलीभाषा व पारंपारिक देवदेवतेत अजिबात फरक आढळून येत नाही.नागरीकरणामुळे पारंपारिक वेशभूषेतत बराचसा फरक पडला आहे.जुन्या काळी डोईवर फेटा ,गळ्यात लांबलचक रूमाल ,धोतर कुर्ता अशी पुरूषांची वेशभूषा असे.कानाला छिद्र व कानात मोठी बाळी हे पुरूषांचं आभूषण होतं.हातात काठी असणं हे आदिम पशूपालक जातीचं प्रतिक पुरूष मिरवत असत.स्त्रींची वेशभूषा फारच ठळक.बंजारा समाजाची ओळख स्त्रीच्या वेशभूषेवरून चटकन ओळखू येते.केसांच्या बटातील वजनदार चांदीची दागिने ,बंजारा साडीवरची कलाकुसर ,पदराला नाण्यांची सजावट ,बंजारा स्त्रीच्या पारंपारिक लालभडक घाग-यासाठी दहा ते बारा मीटर कापड लागते.घाग-याला भडक रंगाची झालर असते.विणकाम केलेला एक पट्टा असतो.काचेची भिंगे असलेली चोळी . केसाच्या अंबाड्याला खोवलेले चांदीचे शिंग (काडी) ,हातात हस्तीदंती पांढऱ्याशूभ्र बांगड्या .जमातीतल्या कुलाप्रमाणे हात ,कापाळावर गोंदलेलं कुलचिन्ह यांमुळे बंजारा स्त्री सहज ओळखू येते.
पारंपारिक लोकगीते ,थाळीभजन ही बंजारा समाजाची खास ओळख.फेर धरून ठेका धरायला लावणारी सामुहिक नृत्ये ,लोककलेचा पारंपारिक आविष्कार .
बदलत्या राज्य व्यवस्थेचे चटके आदिवासी ,भिल्ल ,कैकाडी ,पारधी ,धनगर ,रामोशी ,कंजारभट,छप्परबंद,नंदीवाले अशा अनेक जातीजमातींना बसले.बंजारा समाजही याला अपवाद राहिला नाही.मुळचा पशूपालक असलेला हा समाज समुहानेच भटकंती करत असे व समुहानेच वास्तव्य करत असे.यांचा काफिला तांडा म्हणून ओळखला जात असे.तांड्याच्या मूळपुरूषाच्या नावाने तांडा ओळखला जाई.स्थिर संस्कृतीत तांडे स्थिरावले असले तरी त्यांची ओळख मूळ पुरूष किंवा भोवतालची कायम खुण यावरूनच ठरलेली आहे.उदा.हिरालाल नाईक तांडा,रूपला नाईक तांडा,जांभळीचा तांडा ,गावदरी तांडा वगैरे.
बंजारा समाज हा मातृसत्ताक आहे.पुरूषांची नावेही स्त्रीत्वदर्शक आहेत.उदा.रेखू,हेमला ,रूपला ,धारा ,तारू ,गुलाब.
नायक (नाईक)तांड्याचा प्रमुख असतो.बंजारा समाजाचं अराध्य दैवत संत सेवाभाया महाराज हे सुद्धा नायक(नाईक) होते.नाईक हे पद वंशपरंपरागत असते.थोडक्यात नाईक म्हणजे तांड्याचा राजाच.तांड्यातील सर्व व्यवहार नाईकाला विचारूनच करावे लागत.
कारभारी... नाईकाला मदत करणारी प्रमुख व्यक्ती म्हणजे कारभारी.नाईक राजा तर कारभारी प्रधान.हिशेबाचे काम कारभारी पाहतो.
डांयसाळे... तांड्यातील वडीलधा-या मंडळीचं संघटन म्हणजे डांयसाळे.हे मंडळ म्हणजे तांड्याचे सल्लागार मंडळ.
ढालिया.... सेवा चाकरीचे काम ढालिया करत असे.तांड्या तांड्यातील निरोपाची देवाण घेवाण ढालिया करत असे.
सनार... बंजारांची दागिने करणावळ काम सनार बंजारा करत असे.
अशी आहे बंजारा समाजाची ओळख.इंग्रजी राजवटीत सर्वच भटक्या जाती जमातीचे खूप नुकसान झाले.गुन्हेगारिचा शिक्का कपाळी असा गोंदवला की सगळ्याच भटक्या जाती जमाती उद्ध्वस्त झाल्या.
पण...... बंजारा समाजाचे कौतुकच करावयास हवे.जगण्याचे संदर्भ बदलत असताना बदलाची हवा इतर भटक्यांपेक्षा बंजारा लोकसमुहास अचूक कळली होती.शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे .हे त्यांनी ओळखले होते म्हणून ऊसतोड कामगार असो वा हातावर मजुरी करणारा बंजारा मायबाप असो ,त्यांनी काबाडकष्ट करून बंजारा समाजाची एक संपूर्ण पिढी शिक्षणाच्या लाटेत टाकून दिली.त्याचा परिणाम असा झाला की ही मुलं शिकली व ग्रामसेवक ,तलाठी ,शिक्षक ,वाहन चालक ,वन रक्षक ,पोलीस अशा सरकारी खात्यातल्या कनिष्ठ स्तरावरील नोकरीत आली पण शिक्षण हे वाघिणीचे दूध समजून पिलेल्या याच जमातीतले पुढची मुले तहसिलदार ,खंड अधिकारी ,डीवायएसपी ,एसपी ,फॉरेस्ट ऑफिसर,कलेक्टर अशा उच्च निर्णायक प्रशासकीय जागेवर जाऊन बसली.महाराष्ट्राला विकासाचा वसंत लाभला तोही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे.पुढे सुधाकरराव नाईक हे सुद्धा मुख्यमंत्री झाले.हा खेळ दैवाचा नाही ,योगायोगाचा नाही.हा सत्तापालट केवळ मेहनतीचा व काळाचा रूख ओळखल्याचा आहे.त्यामुळेच संपूर्ण गोर बंजारा समुदाय कौतुकास पात्र आहे.
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.